कोरोनामुळे धबधब्यांवरील बंदी कायम; पावसाळी पर्यटन थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:21 AM2021-07-20T04:21:47+5:302021-07-20T04:21:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित होतात. त्यामुळे तरूणाई याकडे विशेष आकर्षित होते. श्रावण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पावसाळा सुरू होताच जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित होतात. त्यामुळे तरूणाई याकडे विशेष आकर्षित होते. श्रावण महिन्यातील निसर्गसाैंदर्यात तर हे धबधबे अधिकच भर घालतात. पावसाची रिमझिम आणि उन्हाचा खेळ यामुळे धबधब्यांचा आनंद घ्यायला पर्यटकांची पावले आपोआप अशा धबधब्यांकडे वळतात. मात्र, काही वर्षांपासून काही धोकादायक धरणांजवळ दुर्घटना घडल्याने जिल्हा प्रशासनाने अशाठिकाणी जाण्यास बंदी घातली होती. त्यातच गेल्यावर्षापासून कोरोनाचे संकट जिल्ह्यात आल्याने नागरिकांना धबधब्यांवर जाण्यास घातलेली बंदी कायम आहे. त्यामुळे इथले पावसाळी पर्यटन थांबले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील उक्षी, निवळी, रानपाट येथील धबधब्यांवर निसर्गप्रेमींची गर्दी मोठ्या प्रमाणावर दरवर्षी होत असते. शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यातील हे धबधबे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या श्रमपरिहाराबरोबरच मौजमजेची ठिकाणे बनली आहेत. सुट्टीच्या दिवशी वर्षास्नानाचा आनंद घेण्यासाठी तरुण-तरुणींची याठिकाणी गर्दी होते. पानवल येथील धरणाच्या ठिकाणीही धबधब्याचा विलोभनीय आनंद मिळतो, तसेच हे सुरक्षित आणि शांत असे ठिकाण असल्याने अनेकांची याठिकाणी जाण्यासाठी पसंती असते. मात्र, बेभान झालेल्या तरुणाईकडून अतिउत्साहाच्या भरात अनुचित प्रकार घडतात. असे अनुचित प्रकार यापूर्वी घडल्याने तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी धबधब्यांवर सुरक्षेची माहिती देणारे फलक लावण्याची जबाबदारी त्या-त्या ग्रामपंचायतींकडे दिली हाेती. त्याच्या अमलबजावणीची जबाबदारी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली होती. या ठिकाणांवर कायमस्वरूपी जीवरक्षक नेमण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू होते. त्यातच आता कोरोनाचे संकट आल्याने हे सर्व धबधबे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाचा आनंद यावर्षीही पर्यटकांना दुर्लभ झाला आहे.