कोरोनामुळे लहान मुले झाली ‘मोटू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:41+5:302021-07-04T04:21:41+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्ष मुले घरात आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे पालक मुलांना ...
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे गेले दीड वर्ष मुले घरात आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे पालक मुलांना घराबाहेर पाठविण्यास तयार नाहीत. शिक्षणही ऑनलाईन असल्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल आला आहे. तास संपताच मुले व्हिडिओ पाहणे, गेम खेळण्यात मग्न होतात. एकाच जाग्यावर जास्तीत जास्त वेळ बसून राहिल्यामुळे मुलांची जाडी वाढू लागली आहे. त्यामुळे मुलांमध्ये रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह यासारखे आजार बळावू लागल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत.
करमणुकीचे, खेळाचे, अध्यापनाचे साधन मोबाईलच असल्यामुळे मुलांचा घरातल्याशी संवादही कमी झाला आहे. पालक ओरडले तरी मोबाईल हातातील सोडत नाहीत. हॉटेलिंग बंद असले तरी मुले घरात जंकफूडची फर्माईश करीत आहेत. नित्य आहाराबरोबर मधल्यावेळी बेकरी फूड, जंकफूड खात असल्याने मुलांचे वजन वाढत आहे. काही जागृत पालक मुलांना योगासने किंवा दोरीउडी, अंगणातील सायकलिंग किंवा मुलांबरोबर खेळात स्वत: सहभागी होत असल्याने शारीरिक व्यायाम काही प्रमाणात होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे घरात बंद असलेल्या मुलांच्या शारीरिक हालचाली मंदावल्याने मुले टुमटूमीत झाली आहेत. मात्र, मुलांच्या आरोग्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पालकांनी सजग होणे गरजेचे आहे.
पालक काय म्हणतात
ऑनलाईन अभ्यासामुळे मोबाईलची सवय मुलांची वाढली आहे. मोबाईलवर गेम खेळण्याबरोबर टीव्हीवर कार्टून पाहण्यात मुले दंग असतात. एकाच जागेवर मुले जास्त बसत असून, त्यांना सतत भूक लागत असल्याने खाऊ मागतात. यामुळे मुलांचे वजन मात्र वाढले आहे. वजन कमी करण्यासाठी व्यायामाची सवय लावली असली तरी आळसपणा करतात.
- सायली राऊत, पालक
सोसायटीच्या आवारात सायंकाळी मुले बॅडमिंटन, खो-खो, लपाछपी खेळत असत, सायकल चालवीत असल्याने मुलांचा व्यायाम होत असे. मात्र, सध्या कोरोनामुळे हे सर्व खेळ बंद आहेत. ऑनलाईन अध्यापनासाठी मोबाईल दिला असून, तास संपला तरी मुले व्हिडिओ पाहणे, गेम खेळण्यात मग्न होत आहेत. मोबाईल बाजूला ठेवायलाच तयार होत नाहीत.
- आफरीन खान, पालक.
कोरोनामुळे मुलांना घराबाहेर पाठविले जात नाही. ऑनलाईन अध्यापन व गेम यामुळे मोबाईलवर एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून राहिल्याने शारीरिक हालचाल कमी झाल्याने शरीराची जाडी मात्र वाढली आहे. भविष्यातील आरोग्याचा धोका टाळण्यासाठी घरातल्या घरात व्यायाम होईल याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. शक्य झाल्यास अंगणात सायकल चालविणे, दोरीउड्या, लिंबूचमचा, लपाछपी, रस्सीखेच यासारख्या खेळात मुलांबरोबर पालकांनी सहभागी होणे गरजेचे आहे.
- डॉ. श्रीपाद हर्षे, रत्नागिरी
ऑनलाईन अध्यापनामुळे मुलांच्या हातात मोबाईल आला आहे. अध्यापनाचा तास संपल्यावर मुले मोबाईलवर विविध गेम खेळतात, मोबाईलवर व्हिडिओ पाहत बसतात. एकाच जागेवर मुले बसून राहत असल्याने शारीरिक हालचाल मंदावली आहे. नाष्टा, दोनवेळचे जेवण घेतले तरी मधल्या वेळेत मुलांना चटपटीत जंकफूड किंवा बेकरी प्रॉडक्टस् खाण्याची सवय लागली आहे. खेळणं होत नसल्याने वजन मात्र वाढू लागले आहे. सुदृढ आरोग्यासाठी मुलांना व्यायामासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
- डॉ. विजय सूर्यगंध, रत्नागिरी
वजन वाढले कारण...
- गेले दीड वर्ष कोरोनामुळे घराबाहेर पडणे बंद असून, मुले घरातच कोंडून राहिली आहेत.
- शाळा, मैदाने बंद असल्यामुळे शारीरिक व्यायाम होणारे खेळ सध्या बंद आहेत.
- ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल हातात आला आहे. शाळेचा तास संपला की, मुले मोबाईलवर व्हिडिओ, गेम्स खेळण्यात मग्न होतात.
- तासनतास एकाच जाग्यावर बसून राहिल्याने मुलांच्या शरीरावर परिणाम झाला आहे.
- कमी वयात शरीराला स्थूलपणा आला असल्याने मधुमेह, रक्तदाब, हृदयाशी निगडित आजार बळावले आहेत.
वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी
- शरीराच्या सर्वांगीण वाढीसाठी व्यायाम गरजेचा आहे. त्यामुळे किमान लहान मुलांना योगासने करण्यासाठी पालकांनी प्रवृत्त करणे आवश्यक आहे.
- कोरोनामुळे पालक, मुले घरीच आहेत. एकाच जाग्यावर बसून राहिल्याने मुलांची वाढलेली जाडी कमी करण्यासाठी घरातल्या घरात लिंबू चमचा, रस्सीखेच, उठाबशा, लंगडी, दोरीउड्या, आदी घरातल्या घरात खेळ करून घ्यावे. त्यामुळे खेळाचा आनंद व शारीरिक व्यायामही होईल.
- मुलांचा एकलकोंडेपणा घालविण्यासाठी मुलांशी सतत संवाद साधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मुलांना घरातील केर काढायला लावणे, कपड्याच्या घड्या करायला सांगणे, घरातील खोल्या आवारायला सांगणे, कुंड्यांना पाणी घालणे, शक्य झाले तर फरशी पुसायला लावणे, भाजी साफ करणे, तांदूळ, डाळी, कडधान्य साफ करणे, आदी छोटी-छोटी कामे करायची सवय लावता आली तर यामुळे मुलांचा आपोआप व्यायामही होईल, शिवाय मुलांनाही त्यातून आनंद मिळेल.