रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ आता सारीचे संकट, एकूण ११६ रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 02:38 PM2020-07-25T14:38:00+5:302020-07-25T14:42:08+5:30
कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच जिल्ह्यात सारी या साथीच्या आजारानेही धुमाकूळ घातला आहे. मागील तीन महिन्यात जिल्ह्यात सारीचे ११६ रुग्ण आढळून आले असून, १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे सारी आजाराने जिल्हावासियांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे़.
रत्नागिरी : कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच जिल्ह्यात सारी या साथीच्या आजारानेही धुमाकूळ घातला आहे. मागील तीन महिन्यात जिल्ह्यात सारीचे ११६ रुग्ण आढळून आले असून, १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे सारी आजाराने जिल्हावासियांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे़.
सारीच्या तापामध्ये अनेक आजारांचा समावेश असून, हा समूहरोग म्हणून गणला जातो़ सारी आणि कोरोना हे दोन वेगवेगळे आजार असले तरी या दोन्ही आजारांची प्राथमिक लक्षणे सारखीच असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. सारीच्या रुग्णांवर वेळीच उपचार झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.
सारी तापाच्या आजारात जंतूसंसर्ग होऊन सूज येते़ त्याचबरोबर न्युमोनिया होऊन रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण खालावते़ त्यामुळे हृदय, मेंदू, किडनी निकामी होतात़ शरीरात जंतूसंसर्ग झाल्याने आजाराचे वेळेवर निदान होत नाही़ त्यामुळे तापाचे जीवाणू, विषाणू रक्तात मिसळतात़ रक्त तपासणीनंतरही आजाराचे निदान होत नाही़ त्यामुळे त्याचे रूग्ण लवकर लक्षात येत नाहीत.
मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यात सारीचे आतापर्यंत ११६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचा अहवाल जिल्ह्याच्या आरोग्य विभागाकडून वरिष्ठांना सादर करण्यात आला आहे़
जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळत असले तरी आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात आली आहे़. जे कन्टेन्मेंट झोन नाहीत, अशा ठिकाणी ५० घरांचे सर्वेक्षण करण्याची सूचना देण्यात आलेली आहे़ लोकांनी गणेशोत्सवात काळजी घ्यावी़ १ मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवावे तसेच मास्कचा वापर करावा़
- डॉ़ बबिता कमलापूरकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी़
काय आहेत लक्षणे
या आजारामध्ये कोरोनाप्रमाणेच सर्दी, खोकला, ताप येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, ही लक्षणे असतात़ दवाखान्यात दाखल करून उपचार केले, तरच सारीच्या रुग्णांचे निदान होते.