चिपळुणात कोरोनाचा उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:47+5:302021-05-06T04:33:47+5:30
चिपळूण : गेले दोन ते तीन दिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच, मंगळवारी अचानक रुग्ण संख्येने उच्छाद मांडला. ...
चिपळूण : गेले दोन ते तीन दिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच, मंगळवारी अचानक रुग्ण संख्येने उच्छाद मांडला. एकाचदिवशी तब्बल २४६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून, तालुक्याची चिंता कमालीची वाढली आहे. कोरोना कालावधीत आतापर्यंत एकाचदिवशी आढळून आलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे.
चिपळूण तालुक्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडवला आहे. दररोज बाधितांची संख्या वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागात वाढणारा कोरोनाचा संसर्ग पाहता, शासन, प्रशासन व येथील आरोग्य विभागाचे प्रयत्न तोकडे पडू लागले आहेत, असेच काहीसे चिंताजनक चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारी केवळ १९ कोरोना बाधितांची नोंद झाली होती.
त्याआधी दीडशे पार करणारी रुग्णसंख्या शंभरीच्या आत आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र मंगळवारी एकाचदिवशी तब्बल २४६ नवे रुग्ण आढळून आल्याने तालुका हादरला आहे. यामध्ये आरटीपीसीआर टेस्ट केलेले १७७ अहवाल, तर ॲन्टिजेन टेस्ट केलेले ६९ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.