चिपळुणात चालता फिरता मिळताहेत कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:33 AM2021-04-22T04:33:26+5:302021-04-22T04:33:26+5:30
चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून शहरात मोबाईल व्हॅन फिरवून काहींची कोरोना चाचणी केली जात आहे. शासकीय कार्यालये, बाजारपेठेतील चौक ...
चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून शहरात मोबाईल व्हॅन फिरवून काहींची कोरोना चाचणी केली जात आहे. शासकीय कार्यालये, बाजारपेठेतील चौक व गर्दीच्या ठिकाणी अॅन्टीजेन पद्धतीने होत असलेल्या तपासणीत कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहे. बुधवारी शहरातील विविध भागांत झालेल्या तपासणीत १७ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.
सध्या तालुक्यात ११९१ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यांच्यावर विविध खासगी व शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आठवडाभरात रुग्णसंख्या दुपटीने वाढली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणा व प्रशासनही हतबल झाले आहे. अशा स्थितीत प्रशासन पर्यायी कोरोना केअर सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याने ही यंत्रणा हैराण झाली आहे.
गेले काही दिवस आरोग्य विभागाच्या एका पथकामार्फत शहरात मोबाईल व्हॅन फिरवून ठिकठिकाणी कोरोना चाचणी केली जात आहे. बुधवारी शहरातील चिंचनाका, परांजपे मोतीवाले हायस्कूल, भोंगाळे महावीर कॉम्प्लेक्स येथे ५१ जणांची तपासणी करण्यात आली. पवन तलाव मैदान येथील तपासणी केंद्रांवर १५ जणांची आरटीपीसीआर, ३४ जणांची अॅन्टीजेन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण १७ जण कोरोनाबाधित आढळले.