corona in ratnagiri:जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी गुहागरमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 12:51 PM2020-05-12T12:51:18+5:302020-05-12T12:53:01+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये २ आणि दापोली तालुक्यात ३ असे एकूण ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले़ गुहागर तालुक्यातील जामसूत येथील कोरोनाबाधित ६५ वर्षीय रुग्णाचे घरातच निधन झाले़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने तिसरा बळी घेतला.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये २ आणि दापोली तालुक्यात ३ असे एकूण ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले़ गुहागर तालुक्यातील जामसूत येथील कोरोनाबाधित ६५ वर्षीय रुग्णाचे घरातच निधन झाले़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने तिसरा बळी घेतला.
आज सकाळी कोल्हापूर येथून १६ अहवाल प्राप्त झाले़ त्यात ५ जणांचे अहवाल कोरोनाबाधित पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे़ तर ११ अहवाल निगेटिव्ह आले़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत कोरोबाधित रुग्णांची संख्या ५२ झाली आहे़ त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील १० रुग्ण आणि मुंबई, ठाणे, पुणे येथील ४२ रुग्णांचा समावेश आहे.
पहिला रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे आढळून आला होता़ आज पुन्हा गुहागरमध्ये २ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला़ त्यामध्ये पालशेत आणि जामसूद येथील रुग्णाचा समावेश आहे़.
जामसूद येथील पुरुष रुग्णावर मुंबईत उपचार सुरु होते़ अत्यावस्थ असल्याने त्या रुग्णाला जामसूद येथे आणण्यात आले होते़ त्याला घरीच कोरन्टाईन करुन स्वॅब घेण्यात आले़ त्याचे सोमवारी घरातच निधन झाले़ त्यानंतर आज तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने धावपळ उडाली आहे़.
आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण दगावले आहेत़ त्यामध्ये खेड, दापोली आणि गुहागर या तीन तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे़