ग्रामीण भागातील कोरोना आवरणे कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:49+5:302021-07-21T04:21:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लांजा : कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण व मृत्युदर कमी होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लांजा : कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण व मृत्युदर कमी होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संक्रमण गतिमान असल्याने तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त ग्रामीण भागामध्ये झाला आणि आता तो आटोक्यात येताना कठीण होऊन बसले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये नागरिकांनी काळजी घेतली होती. महानगरातून येणाऱ्या चाकरमानी मंडळींना १४ दिवस विलगीकरण केल्यानंतर त्यांच्यावर ग्राम कृतिदल व आरोग्य विभागाने लक्ष ठेवले होते. १४ दिवसांच्या कालावधीनंतर त्यांना इतरांमध्ये सहभागी होता येत होते. पहिल्या लाटेमध्ये नियमांचे कडक पालन करण्यात आल्याने तेव्हा तालुक्यात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव दिसला नाही. पहिल्या लाटेमध्ये मृत झालेल्यांमध्ये वयोवृद्धांची संख्या अधिक होती.
साधारण मार्च महिन्यामध्ये दुसरी लाट आली. पहिल्या लाटेचे रुग्ण कमी झाल्यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता आली. महानगरातून आलेले चाकरमानी विलगीकरण न होता थेट आपल्या कुटुंबामध्ये सहभागी झाल्याने कोरोनाचे संक्रमण ग्रामीण भागामध्ये होऊ लागले. तसेच लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम यामध्ये ग्रामस्थांनी गर्दी, पाहुणे जाणे-येणे वाढल्याने संक्रमणही त्याच वेगाने वाढले. तालुक्यातील गावा-गावातील वाडीवस्त्यांवर कोरोनाने आपला फास घट्ट आवळला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये दिवसागणिक रुग्ण झपाट्याने वाढत गेले. लागण झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये तरुण व वृद्ध यांचे बळी गेल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली. सध्या कोरोना रुग्णांमध्ये घट-वाढ होताना दिसत आहे. रुग्णांमध्ये घट होत असली तरी दुसऱ्या लाटेमध्ये मोठा दणका दिला आहे. तालुक्यातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या ३६१७ झाली आहे. यामधून ३३६२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाणात वाढ झाल्याने तालुक्यात १३६ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील १७ रुग्ण गृह विलगीकरणात, ७० रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात तर १६ रुग्ण देवधे येथील कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत आहेत. आतापर्यंत ११९ जणांचे कोरोनाने बळी घेतले आहेत.
लांजा तालुका
एकूण रुग्ण ३६१७
कोरानामुक्त ३३६२
मृत्यू ११९
सक्रिय १३६
गृह अलगीकरण १७
संस्थात्मक अलगीकरण ७०