शिर्के प्रशालेतील केंद्रावर दोन दिवसात ६१० नागरिकांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:31 AM2021-04-21T04:31:01+5:302021-04-21T04:31:01+5:30
रत्नागिरी : शहरातील रा. भा. शिर्के प्रशालेत रविवारपासून तपासणी केंद्र (Testing Center) सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी आरटीपीसीआर व ...
रत्नागिरी : शहरातील रा. भा. शिर्के प्रशालेत रविवारपासून तपासणी केंद्र (Testing Center) सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी आरटीपीसीआर व अँटिजेन अशा दोन्ही प्रकारच्या तपासण्या करण्यात येत आहेत. सुरू झाल्यापासून दोन दिवसात या तपासणी केंद्रावर एकूण ६१० व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे, लक्षणे दिसून येत नसलेल्यांची अँटिजेन तपासणी करण्यात येईल. सौम्य अथवा तीव्र लक्षणे असलेल्या व्यक्तींची अँटिजेन, आरटीपीसीआर चाचणी ही तपासणी केंद्रावरील डॉक्टर अथवा आरोग्य कर्मचारी ठरवतील, त्याअनुषंगाने करण्यात येईल. कोणीही आरटीपीसीआर तपासणीसाठी तगादा लावू नये. कोणत्याही संस्थेने कर्मचाऱ्यांच्या - कामगारांच्या आरटीपीसीआर तपासणीची अट ठेवू नये. या तपासणीच्या निष्कर्षांबाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी शिर्के हायस्कूल येथे स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला असून त्याठिकाणी या तपासणीबाबतचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. जाखड यांनी कळविले आहे.
व्यापाऱ्यांच्या कोरोना तपासणीसाठी फिरते तपासणी पथक निर्माण करण्यात येत असून व्यापाऱ्यांनी अथवा त्यांचे अधिनस्त कामगारांनी या फिरत्या तपासणी पथकामार्फत तपासणी करून घ्यावी. या तपासणीचे प्रमाणपत्र त्याच ठिकाणी देण्याबाबत व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही डाॅ. जाखड यांनी कळविले आहे.