तळवडे गावात येणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:25 AM2021-05-03T04:25:57+5:302021-05-03T04:25:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाचल : राजापूर तालुक्यातील तळवडे गावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचल : राजापूर तालुक्यातील तळवडे गावात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत व ग्राम कृती दलाने कंबर कसली असून गावात कडक निर्बंध लागू केले आहेत. गावात येणाऱ्या प्रत्येकाला काेराेना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या ग्रामपंचायत व ग्राम कृती दलाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्यावर्षी गावात एकही कोरोना रुग्ण नव्हता. ग्रामपंचायत व ग्राम कृती दलाने गावात अतिशय चांगल्याप्रकारे काम करून कोरोनाला गावच्या वेशीवरच रोखला होता. मात्र, यावेळी कोरोनाने गावात थैमान घातले असून आतापर्यंत गावात २५ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. कोरोनाची ही वाढती रुग्णसंख्या व कोरोनाचा प्रादुर्भांव रोखण्यासाठी ग्राम कृती दल व ग्रामपंचायतीने गावात कडक निर्बंध लागू केले आहेत. गावात बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला कोरोना चाचणी बंधनकारक केली असून, चाचणीचा अहवाल येईपर्यंत संबंधित व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम क्वारंटाईन केलेली व्यक्ती घराबाहेर पडल्यास ५०० रुपये दंड थोठावण्यात येणार आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवरही ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच प्रशासनाच्या नियमांचे देखील काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत. या सर्व नियमावलीचे पत्रक ग्रामपंचायतीच्या वतीने काढण्यात आले असून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सरपंच प्रदीप प्रभुदेसाई, ग्राम कृती दलाचे संदीप बारसकर, पत्रकार सुरेश गुडेकर, आरोग्य सेवक ढोले, तलाठी विकास भंडारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष मसूरकर, अंगणवाडी सेविकांसह ग्रामस्थही उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.