होळीसाठी कोरोना टेस्ट निगेटिव्ह असणे सक्तीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:29 AM2021-03-21T04:29:15+5:302021-03-21T04:29:15+5:30
नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे किंवा अन्य भागांत स्थिरावलेली मंडळी शिमगोत्सवासाठी आवर्जून गावाकडे येतात. मात्र, कोरोना संसर्ग वाढू नये व ...
नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे किंवा अन्य भागांत स्थिरावलेली मंडळी शिमगोत्सवासाठी आवर्जून गावाकडे येतात. मात्र, कोरोना संसर्ग वाढू नये व शिमगोत्सव साधेपणाने साजरा करण्यात यावा, यासाठी प्रशासनाने निर्बंध जारी केले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रामधून रत्नागिरी जिल्ह्यात होळीच्या सणासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी ७२ तासांपूर्वीचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लोकांना एसपी ओटू टेस्टिंग व थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक राहणार आहे. त्यासाठी नागरी व ग्रामकृती दल यांनी शाळा अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सर्दी, खोकला व इतर कोविडसदृश लक्षणे असलेल्या कोणत्याही नागरिकाला शिमगोत्सव कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. शिमगोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शिमगोत्सवाकरिता मुंबई-पुण्यावरून भाविक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात शिमगा उत्सव, होळी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील, असे या आदेशात म्हटले आहे.
सर्व मंदिर विश्वस्त व पालखीधारक यांनी लगतच्या आरोग्य यंत्रणेकडून आरटीपीसीआर, रॅपिड ॲण्टीजेन चाचणी करून घेणे गरजेचे आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच स्थानिक ग्रामदेवतेच्या पालखीला रूपे लावणे, सजविणे बंधनकारक केले आहे. २५ ग्रामस्थ व मानक-यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेटीसाठी जाणार आहे. पालखी शक्यतो वाहनातून नेणे शक्य नसल्यास पालखीधारकांनी स्वत: वाहून नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. ५० लोकांपेक्षा जास्त लोक जमा होणार नाहीत, याची दक्षता मंदिर विश्वस्त, व्यवस्थापक, ग्रामस्थ, मानकरी, नागरी व ग्रामकृती दल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. शिवाय, पालखी दर्शनाच्या वेळा निर्धारित करून देण्याची सूचना केली आहे.
होळी व पालखीची पूजा, नवस, पेढे, हार, नारळ आदी स्वरूपात स्वीकारू नयेत, तसेच प्रसादवाटपही करू नये. सहाणेवर पालखी व होळीच्या दर्शनासाठी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक वाॅर्डातील, भागातील लोकांना स्वतंत्र दिवस किंवा या कालावधीत तीनतीन तास नेमून देण्याची सूचना केली आहे. उपस्थितांना मास्क बंधनकारक असून मास्कवापराचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. उपस्थितांचे थर्मल स्क्रिनिंग, हॅण्ड सॅनिटायझरचा वापर बंधनकारक केला आहे.
शिंकताना किंवा खोकताना टिश्यू पेपर किंवा हातरूमाल किंवा हाताच्या कोपराने नाक व तोंड पूर्णपणे झाकले जाईल, याची दक्षता घेण्यात यावी. एकदा वापरलेल्या टिश्यू पेपरची योग्य विल्हेवाट लावावी. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
पालखी घरोघरी नेणे, गर्दीमध्ये नाचविणे, यासाठी मनाई करण्यात आली आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार होम करण्यास परवानगी राहील. गावात खेळे, नमन आदी लोककलेचे कार्यक्रम करू नयेत. प्रथेपुरते खेळ्यांचे कार्यक्रम २५ ते ५० व्यक्तींच्या उपस्थितीत करावयाच्या सूचना केल्या आहेत. धूलिवंदन व रंगपंचमीच्या दिवशी रंग उधळण्याचे टाळावे. ओळखीच्या छाेट्या समूहामध्ये रंग खेळावेत.
मुंबईतील ग्रामस्थांना शक्यतो गावी न येण्याचे आवाहन करावे. होळीच्या कार्यक्रमाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक व वेबसाइट इत्यादी माध्यमांद्वारे उपलब्ध करून दिल्यास गावी न येणाऱ्या चाकरमानी यांना होळीचा कार्यक्रम पाहणे शक्य होईल. मुंबई, पुणे किंवा अन्य भागांतून प्रतिबंधित क्षेत्रामधून येणाऱ्या नागरिकांच्या चाचणीसाठी नागरी व ग्रामकृती दल यांनी शाळा अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी स्क्रिनिंग सेंटर उभारावेत. या स्क्रिनिंग सेंटरबाबत फ्लेक्सद्वारे जनजागृती करावी. स्क्रिनिंग सेंटरवर सर्दी, खोकल्यासारखी लक्षणे आढळल्यास त्यांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत.
ग्रामकृती दल व नागरी कृती दल यांनी ५० पेक्षा जास्त लोकांची गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आदेशाचे उल्लंघन झाल्यास आणि कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून आल्यास ते पूर्ण क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार असल्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे.