औद्योगिक वसाहतीत कामगारांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:31 AM2021-04-18T04:31:25+5:302021-04-18T04:31:25+5:30
आवाशी : खेड तालुक्याच्या लोटे औद्योगिक वसाहतीत कोरोनाने मोठ्या प्रमाणावर शिरकाव केल्याने कंपन्यांनी कामगारांची सक्तीने कोरोना चाचणी करण्यात सुरुवात ...
आवाशी : खेड तालुक्याच्या लोटे औद्योगिक वसाहतीत कोरोनाने मोठ्या प्रमाणावर शिरकाव केल्याने कंपन्यांनी कामगारांची सक्तीने कोरोना चाचणी करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित कामगार निदर्शनास येत आहेत.
मागील वर्षी खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांमध्ये कोरोनाने प्रवेश केला. त्यावेळी याची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून केलेल्या टाळेबंदीचा फटका येथील औद्योगिक वसाहतीलाही बसला. यावर मात करण्यासाठी येथील काही कंपन्यांनी कामगारांची कोरोना चाचणी करून घेतली. घरडा केमिकल्स या कंपनीने यात सर्वप्रथम पुढाकार घेतला व कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच कंपनीत प्रवेश दिला. यासाठी या कंपनीतील कामगारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.
मात्र, यावर्षी फेब्रुवारीपासून पुन्हा डोके वर काढलेल्या या विषाणूने एप्रिल महिन्यात औद्योगिक वसाहतीत प्रवेश केला आहे. घरडा कंपनीने राबविलेल्या उपक्रमाचे अनुकरण करत वसाहतीतील अनेक कंपन्यांनी आता स्वत:हून कामगारांची कोरोना चाचणी करणे सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या या चाचणीत प्रत्येक कंपनीतील कोरोना पॉझिटिव्ह कामगार पुढे येत आहेत.
काही कंपन्यांनी सक्ती केलेल्या या चाचणीतून अनेक जण पॉझिटिव्ह येण्याच्या भीतीने मानसिक दबावाखाली आहेत. मात्र, स्वत:हून चाचणी करण्यासाठी येणाऱ्या कामगारांची संख्याही वाढती आहे. याचबरोबर येथील लोटे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू केले आहे. त्याचाही लाभ मोठ्या प्रमाणावर घेतला जात आहे. काही वेळा लस संपल्याने अनेकांना माघारी परतावे लागत आहे.
कंत्राटी कामगारांचीही चाचणी व्हावी
कंपनी कायमस्वरूपी कामगारांची चाचणी करून घेत आहे. त्याचप्रमाणे कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कामगारांचीही चाचणी त्या कंपन्यांनी करून घ्यावी, अशी मागणी होत आहे. स्थानिक ग्रामपंचायतीनेही आपल्या कार्यक्षेत राहणाऱ्या परगावातील, परजिल्ह्यातील व परप्रांतातील कामगारांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशीही मागणी होत आहे.