कोरोना काळात वर्षभर रुग्णांच्या संपर्कात येऊनही खबरदारीमुळे अबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:13 AM2021-05-04T04:13:57+5:302021-05-04T04:13:57+5:30
रत्नागिरी : कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव केल्यास एक वर्ष उलटून गेले आहे. मे महिन्यापासून जिल्ह्यात काेरोनाचा संसर्ग अधिक वाढला. त्याचबरोबर ...
रत्नागिरी : कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव केल्यास एक वर्ष उलटून गेले आहे. मे महिन्यापासून जिल्ह्यात काेरोनाचा संसर्ग अधिक वाढला. त्याचबरोबर रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या वर्षभरात अन्य आजारांच्या गंभीर रुग्णांबरोबरच कोरोना रुग्णांना कोल्हापूर, मुंबई, पुणे आदी मोठ्या शहरांमध्ये पुढच्या उपचारासाठी घेऊन जाण्याचे काम रत्नागिरीतील ११ रुग्णवाहिकांचे मालक आणि त्यांच्याकडील चालक अव्याहतपणे करीत आहेत. मात्र, सर्वच रुग्णांची सुरक्षितता याचबरोबर आपल्या घरच्यांचीही काळजी यामुळे हे मालक आणि चालक योग्य ती खबरदारी घेत असल्याने आतापर्यंत हे सर्व कोरोनापासून अबाधित आहेत.
रत्नागिरीत ११ खासगी रुग्णवाहिका असल्या तरी महामार्ग तसेच अन्य मार्गांवर वाढलेले अपघात, विविध गंभीर आजारांचे रुग्ण आणि त्यात गेल्या वर्षीपासून वाढलेले काेरोनाचे रुग्ण यामुळे जिल्ह्यातील शासकीय १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील ११ रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी दिवसरात्र तत्पर आहेत. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच खासगी रुग्णवाहिकांची संख्याही काहींनी वाढविली आहे.
गतवर्षी मे ते सप्टेंबर या कालावधीत कोरोनाचा आलेख जिल्ह्यात वाढता होता. गंभीर रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण वाढल्याने रुग्णांमध्ये भीती वाढली होती. त्यामुळे पाॅझिटिव्ह आलेल्यांमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर या मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढती होती. मात्र, संसर्गाच्या भीतीने अशांबरोबर त्यांचे नातेवाईक जाण्यास घाबरत असत. मात्र, या काळात त्यांच्या नातेवाईकांची वाट न बघता स्वत:च्या जीवाला धोका पत्करून या रुग्णांना इतरत्र हलविण्याची कामगिरी या खासगी रुग्णवाहिकांनी केली.
ऑक्टोबरनंतर काहीसे प्रमाण कमी झाले असले तरी फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेचा संसर्ग अधिक आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच जवळपास ११ हजारापेक्षा अधिक रूग्ण बाधित झाले आहेत. त्यातच उशिरा उपचारासाठी दाखल हाेत असल्याने हे रुग्ण गंभीर होण्याचे तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या दाेन ते तीन महिन्यांपासून अशा रुग्णांना मोठ्या शहरात हलविण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांवरही मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांचे नातेवाईक त्यांच्यासोबत जाण्याकरिता घाबरत असले तरी रुग्णवाहिकांचे मालक आणि काही वेळा त्यांचे चालक जोखीम पत्करूनही अशा रुग्णांना मोठ्या शहरात उपचारासाठी नेत आहेत.
मात्र, कोरोनाव्यतिरिक्त अन्य रुग्णांचीही वाहतूक करावी लागते. त्याचबरोबर घरी आल्यानंतर घरी असलेल्यांनाही संसर्ग होणार नाही, ही काळजी त्यांना घ्यावी लागते. ती तेवढ्याच खबरदारीने घेतात. त्यामुळेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात कित्येक तास घालवूनही गेले वर्षभर ते अबाधित राहिले आहेत.
सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क कायम
रुग्णवाहिकेतून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण न्यावे लागत असल्याने प्रत्येक वेळी रुग्णवाहिका निर्जंतूक करून घ्यावी लागते. त्याचबरोबर स्वत:चीही काळजी घेताना मास्क, सॅनिटायझर याचा वापर करावा लागतो. पीपीई कीट गाडी चालविताना अडचणीचे होते. उन्हाचाही त्रास होतो. त्यामुळे ते वापरता येत नसले तरी वैयक्तिक खबरदारी घ्यावी लागते. घरी परतल्यानंतर पहिल्यांदा सर्व वस्तू निर्जंतूक करून आंघोळ करावी लागते. गेले वर्षभर हे कोरोना योद्धे आपल्याच माणसांपासून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करीत आहेत. म्हणूनच ते कोरोनाला दूर ठेवत आहेत.
रुग्णवाहिका मालक आणि चालकही अबाधित
रत्नागिरीतील खासगी रुग्णवाहिकांचे मालक तनवीर जमादार, भाई मयेकर, आजिम फकीर, शिरी कीर, शुभम कीर, जुबेर जमादार, योगेश उत्तेकर, गणेश गोराठे, नंदू पावसकर, सज्जन लाड, तोफीक काझी, फिरोज पावसकर, तसवर खान यांच्याबरोबरच त्यांचे चालक आदेश पाटील, वैभव गुरव, लियाकत शेख, साजिद वस्ता, दानिश जमादार, राहील सोलकर, गणेश मुळ्ये, दादा साखरकर, शानू मुकादम, नायमत पावसकर, इबू बट्टुरे, रमजान दर्वे हे चालकही योग्य खबरदारी घेत कोरोना तसेच अन्य रुग्णांना उपचारासाठी इतरत्र नेत आहेत.
कोटसाठी
गेले वर्षभर आणि अन्य गंभीर रुग्णांबरोबरच कोरोना रुग्णांना दुसऱ्या मोठ्या शहरात पुढच्या उपचारासाठी घेऊन जात आहोत. परंतु सध्याचे कोरोनाचे संकट पाहता आमच्याबरोबरच आमच्या घरातील लहान मुले आणि वृद्ध यांचीही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे ही सेवा करतानाच आम्ही कोरोनाविषयक योग्य ती खबरदारी घेतो.
- तनवीर जमादार, अध्यक्ष, ॲम्ब्युलन्स संघटना, रत्नागिरी
या बातमीसाठी ३ रोजीच्या शोभना फोल्डरमध्ये १ क्रमांकाचा फोटेा आहे