गुहागरात कोरोना लसीकरण सुरु, पुरवठा होणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:37+5:302021-04-08T04:31:37+5:30
गुहागर : तालुक्यात दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना, याला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने कमी कर्मचारी संख्या असतानाही तब्बल ७ ...
गुहागर : तालुक्यात दिवसागणिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना, याला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने कमी कर्मचारी संख्या असतानाही तब्बल ७ केंद्रांमधील लसीकरणाचा वेग वाढविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. तरीही अद्याप झालेल्या लसीकरणाचा आकडा पाहता, जनतेतून प्रतिसाद मिळत नसल्याचेच दिसून येत आहे.
सध्या तालुक्यात ७ लसीकरण केंद्र असून, यामध्ये ग्रामीण रुग्णालय - गुहागर, प्राथमिक आरोग्य केंद्र - हेदवी, तळवली चिखली, आबलोली, कोळवली व वेळंब उपकेंद्र यांचा समावेश आहे. या प्रत्येक केंद्रावर एक परिचारिका, आशा, परिचर, आलेल्यांची नोंद करण्यासाठी एक व लस देण्यासाठी असे पाच कर्मचारी कार्यरत आहेत. आधीच आरोग्य विभागांतर्गत अनेक पदे रिक्त असताना वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कमी कर्मचारी संख्येत कामाचा ताण वाढत आहे. कमी कर्मचारी संख्या लक्षात घेऊन काही केंद्रांवर लस घेण्यासाठी आलेल्यांची नोंद करण्यासाठी शिक्षकांमधून तंत्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, आलेली लस कोल्ड चेन सिस्टीमद्वारे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंंद्र व ग्रामीण रुग्णालयात असलेल्या आयएफआर (फ्रीज)मध्ये सुरक्षित ठेवली जात आहे. चिखली व आबलोली उपकेंद्रांमधील मोठे अंतर लक्षात घेऊन एकमेव वेळंब उपकेंद्रात लसीकरण होत आहे. याठिकाणी लस घेण्यासाठी आलेल्या लोकांची पुरेशी संख्या लक्षात घेऊन लस कॅरियरद्वारे आबलोली प्राथमिक आरोग्य केंंद्रातून आणून वेळंब उपकेंद्रात दिली जात आहे.
लसीकरणाचा वेग आणखी वाढावा, यासाठी शृंगारतळी या मध्यवर्ती ठिकाणी विष्णूपंत मेमोरियल हॉस्पिटलमध्ये लसीकरणाची परवानगी देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच अंजनवेल ग्रामपंचायतीनेही येथील युसुफ मेहरअली सेंटरमध्ये लसीकरण केंद्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे.
तालुक्यातील कर्मचारी संख्या लक्षात घेता, मंजूर पदांच्या अर्धेच कर्मचारी कार्यरत आहेत. दैनंदिन कामकाज सांभाळून वाढत्या कोविड रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी उपाययोजना व नियोजन करताना कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर येत आहे.
गुहागर तालुक्यात झालेली लसीकरणाची आकडेवारी पाहता पहिल्या लसीकरण डोसमध्ये कोवॅक्सिन १ हजार ४३४ व कोविशिल्ड ३ हजार ८३ तर कोविशिल्डचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ६५७ इतकी आहे.
...................
सुरूवात संथ, आता गती
सुरुवातीच्या काळात लसीकरणाचा वेग खूपच कमी होता. त्यावेळी कोरोना रुग्णांची संख्याही कमी होती. गेल्या काही दिवसात झपाट्याने सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. याला गुहागर तालुकाही अपवाद नाही. वाढत्या कोरोनाच्या भीतीपोटी व लस घेण्यासाठी ४५ वर्षांपुढील वयोमर्यादा केल्याने लस घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लसीकरणाचा वेग वाढत असताना पुरेशा प्रमाणात शासनाकडून लस पुरवठा होणे गरजेचे आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी देवीदास चरके यांनी सांगितले.
पद मंजूर कार्यरत रिक्त
आरोग्यसेविका ३५ १५ २०
आरोग्यसेवक ३१ २० ११
परिचर २१ १० ११
आरोग्य सहाय्यिका ५ ३ २
कनिष्ठ सहाय्यक ६ ५ १
फार्मसिस्ट ५ २ ३
वैद्यकीय अधिकारी ९ ५ ४
तालुक्यातील लसीकरणाची केंद्रनिहाय आकडेवारी
केंद्र कोवॅक्सिन कोविशिल्ड कोविशिल्ड (दुसरा डोस)
तळवली ० ६१७ ४
चिखली ० १५८ ०
आबलोली ४७१ १२६ ५
वेळंब १७९ ० ०
कोळवली ० ३१ ४
हेदवी ४२८ ४८७ १
ग्रामीण रुग्णालय, गुहागर ३५६ १६६४ ७४३
एकूण १४३४ ३०८३ ७५७