कोरोना लस, रेमडेसिविर संपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:31 AM2021-04-18T04:31:08+5:302021-04-18T04:31:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचे संसर्ग वाढत असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे ऑक्सिजन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाचे संसर्ग वाढत असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे ऑक्सिजन साठा काही प्रमाणात शिल्लक आहे. मात्र, रेमडेसिविर आणि लसीचा साठा संपलेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मेटाकुटीला आली आहे. जिल्ह्यात १४,५६० कोरोना पॅाझिटिव्ह रुग्ण असून, ११,४८८ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४२९ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस दररोजच्या रुग्णांपेक्षा ५०० पेक्षा जास्त रुग्णांची भर पडत आहे.
रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा लाभ १,१५,९०३ लोकांनी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याला लसींची गरज पाहता पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने आरोग्य विभागाकडून आणखी तीन लाख लसींची मागणी करण्यात आली आहे.
रेमडेसिविर आणि लसींचा साठा संपलेला आहे. मात्र, ऑक्सिजनचा साठाही व्हेंटिलेटरवर असल्याने तोही लवकरच संपणार आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रेमडेसिविरचा साठा संपला
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झपाट्याने रुग्णांची वाढ होत चालली आहे. कोरोनाचा रुग्ण अत्यवस्थ असल्यास त्याला रेमडेसिविर इंजेक्शन देण्यात येते. जिल्ह्यासाठी डिसेंबर, २०२० मध्ये १,६०० रेमडेसिविर इंजेक्शनचा शासनाकडून जिल्हा शासकीय रुग्णालयाला पुरवठा करण्यात आला होता. मात्र, अचानक रुग्ण वाढल्याने शुक्रवारी रेमडेसिविरचा साठा संपलेला असून, अजिबात शिल्लक नाही. आणखी २,६८३ रेमेडेसिविरची शासनाकडे १ एप्रिलला करण्यात आलेली आहे.
लसीचा अपुरा पुरवठा
जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. कोरोना लस १,३०,२०० आले. या लसीचा फायदा जिल्ह्यातील १,१५,९०३ लाेकांनी घेतला आहे. या लसीकरणास लोकांकडून भरमसाट प्रतिसाद मिळत असल्याने मागणी वाढली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून शासनाकडे तीन लाख लसींची मागणी करण्यात आली आहे. लस संपल्याने लसीकरण स्थगित करण्यात आले आहे.
ऑक्सिजनची गरज भासणार
कोरोनाचा वेग पाहता रुग्णांची संख्या दिवसाला ५०० पेक्षा जास्त पॅाझिटिव्ह रुग्ण येत आहेत. जिल्ह्यातील १,८८१ बेडसपैकी ४४१ ऑक्सिजन बेडस आहेत. रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजन बेडस् आणखी वाढविण्याची आवश्यकता आहे. ऑक्सिजन बेड अजूनही काही प्रमाणात शिल्लक आहेत. मात्र, रुग्णांची संख्या वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लँटही उभारण्यात येत असून, त्याचे काम सुरू आहे. तरी ऑक्सिजन साठाही अपुरा पडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण दिवसेंदिवस वाढतो आहे. तरीही आरोग्य यंत्रणा आपले काम प्रामाणिकपणे करीत आहेत. दुसरी लाट असल्याने त्याचा फैलाव लवकर होत आहे. तो होऊ नये, यासाठी लोकांनीही कोविडच्या अटी, नियमांचे पालन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेकडून जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करण्यात येत आहे. तसेच रेमेडेसिविरचाही साठा रुग्ण वाढीमुळे संपलेला आहे. त्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत रेमडेसिविरचा पुरवठा करण्यात येईल असे वरिष्ठांकडून कळविण्यात आले आहे.
- डाॅ. संघमित्रा फुले-गावडे,
जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी.