corona virus : महाकालीच्या पालखीला भोई केवळ वीसच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 01:04 PM2020-10-09T13:04:17+5:302020-10-09T13:05:52+5:30
Navratri, ratnagirinews, mahankali प्रति कोल्हापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडिवरे (ता. राजापूर) येथील श्रीदेवी महाकालीच्या नवरात्रोत्सवावरही कोरोनामुळे यावर्षी बंधने आली आहेत. नवरात्रोत्सव काळात मंदिरांतर्गतच सर्व धार्मिक कार्यक्रम होणार असून, मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. निर्बंधामुळे यावर्षी पालखीसोबत केवळ २० भोई, २ अब्दागिर आणि २ ढोल ठेवण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे.
अरुण आडिवरेकर
रत्नागिरी : प्रति कोल्हापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडिवरे (ता. राजापूर) येथील श्रीदेवी महाकालीच्या नवरात्रोत्सवावरही कोरोनामुळे यावर्षी बंधने आली आहेत. नवरात्रोत्सव काळात मंदिरांतर्गतच सर्व धार्मिक कार्यक्रम होणार असून, मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. निर्बंधामुळे यावर्षी पालखीसोबत केवळ २० भोई, २ अब्दागिर आणि २ ढोल ठेवण्याचा निर्णय देवस्थानने घेतला आहे.
महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांपैकी एक आणि नवसाला पावणारी देवी म्हणून आडिवरे येथील श्रीदेवीची महती आहे. मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मंदिराभोवती विविध प्रकारची दुकाने थाटण्यात येत असल्याने जत्रेचे स्वरूप आलेले असते. स्थानिकांबरोबरच घाटमाथ्यावरून व्यापारी याठिकाणी दुकाने थाटतात. नऊ दिवस मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रिघ लागलेली असते. दूरवरून भाविक मंदिरात देवीचे दर्शन घेण्याबरोबरच ओटी भरण्यासाठी येतात.
कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. शासनाच्या या निर्णयाचे पालन करत श्रीदेवी महाकाली देवस्थानने यावर्षी मंदिरांतर्गत सर्व धार्मिक विधी देवस्थान व पुजाऱ्यांतर्फे करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त रात्री मंदिरात आरती केली जाते. त्यानंतर देवीची पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर असतात. पण, यावर्षी गर्दी टाळण्यासाठी पालखीसोबत मोजक्याच भाविकांनी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या सावटामुळे इतिहासात प्रथमच नवरात्रोत्सवात देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे.
असे होणार कार्यक्रम
- घट बसविणे : सकाळी १० वाजता
- घटाची आरती : दुपारी ३ वाजता
- प्रवचन : सायंकाळी ७.३० वाजता
- गायन : ८.३० वाजता
- पालखी प्रदक्षिणा : रात्री ९.३० वाजता.
करमणुकीचे कार्यक्रम रद्द
नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्थानिक कलावंतांचा यामध्ये सहभाग असतो. कोरोनामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
अशी राहणार उपस्थिती
- आरतीसाठी ५ माणसे
- पालखीचे भोई २०
- अब्दागिर २
- ढोल २
नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत अजून गोंधळाचे वातावरण आहे. शासन मंदिरे खुली करण्याबाबत विचार करत आहे. तरीही आडिवरे येथील देवस्थानने शासनाच्या नियमांचे पालन करूनच उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांनी गर्दी न करता दूरूनच हात जोडून नमस्कार करावा.
- विश्वनाथ शेट्ये,
अध्यक्ष श्री महाकाली देवस्थान.