corona virus : रत्नागिरीत कोरोनाने घेतला पोलिसाचा पहिला बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 03:56 PM2020-09-15T15:56:21+5:302020-09-15T15:58:31+5:30
रत्नागिरी पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात काम करणारे पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा वसंत पाचेरकर यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात काम करणारे पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा वसंत पाचेरकर यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. मागील दोन दिवसांपासून त्यांना जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले होते. रत्नागिरी पोलीस दलातील कोरोनामुळे हा पहिलाच बळी गेला असून, या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
ज्योतिबा वसंत पाचेरकर हे पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अचानक खालवली होती. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. मात्र, सोमवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्याने त्यांचा मृत्यू झाला.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच कोरोनापासून नागरिकांची संरक्षण होण्यासाठी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर उतरून पहारा देत आहेत.
जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलातही कोरोनाने शिरकाव केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करून ते पुन्हा सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी पोलिसांसाठी कोविड सेंटर सुरू केले होते. पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव वाढत असून, त्यातच ज्योतिबा पाचेरकर यांचा मृत्यू झाला. पाचेरकर यांच्या मृत्यूमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.