corona virus : तब्बल सोळा तासांनी कोरोना चाचणी, खासगी रुग्णालयांसमोर प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:41 PM2020-07-28T12:41:28+5:302020-07-28T12:44:19+5:30
तब्बल सोळा तासांनंतर अपघातग्रस्त रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा संबंधित रुग्णावर त्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू झाले.
टेंभ्ये : रविवार, दि. २६ रोजी रात्री ८ वाजता अपघात झालेल्या एका रुग्णाला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या रुग्णाचा मेंदूचा स्कॅनिंग रिपोर्ट नॉर्मल आला. परंतु श्वास घ्यायला त्रास होत असल्याने संबंधित रुग्णालयाकडून जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे कोरोना टेस्ट किटची मागणी करण्यात आली. त्यानंतर तब्बल सोळा तासांनंतर या रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा संबंधित रुग्णावर त्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू झाले.
अपघातग्रस्त रुग्णाला सोळा तास वाट पाहायला लागणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामुळे आमच्या रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण झाला असता तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.
रविवारी रात्री ८ वाजता या रुग्णाचा हातखंबा ते निवळी दरम्यान अपघात झाला. दुचाकी रस्त्यावरून घसरल्याने डोक्याला मार लागला होता. डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याने तातडीने त्याला रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
संबंधित रुग्णालयाने अपघातग्रस्त रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करून घेतले व मेंदूच्या दुखापतीसंदर्भातील सर्व चाचण्या केल्या. या चाचण्यांचे सर्व अहवाल चांगले आले. परंतु त्या अपघातग्रस्त रुग्णाला श्वसनाचा त्रास होत असल्याने कोरोनाची चाचणी करणे आवश्यक असल्याचे या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले.
रुग्णालयातर्फे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे तत्काळ रॅपिड टेस्ट किटची मागणी करण्यात आली. परंतु जिल्हा रुग्णालयाकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
अशा परिस्थितीत या रुग्णाला सोमवारी दुपारी बारा वाजेपर्यंत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आले. तेथे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. स्वॅबही घेण्यात आला. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा या रुग्णाला त्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले व त्याच्यावरील पुढील उपचार सुरू झाले.
या सर्व प्रक्रियेमध्ये वाया गेलेला सोळा तासांचा कालावधी हा एखाद्या रुग्णासाठी जीवघेणा ठरू शकतो. यासाठी अपघातग्रस्त रुग्णांची कोरोना चाचणी तातडीने होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अपघातग्रस्त रुग्णांना हाताळणाऱ्या खासगी रुग्णालयांना कोरोना चाचणीचे किट उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अशा सुविधा दिल्या जात नसल्याने कोरोना व्यतिरिक्तच्या गंभीर रूग्णांना दाखल करून घेण्यास अनेकजण टाळत आहेत.
उपचार करणार तरी कसे?
खासगी रुग्णालयामध्ये कोरोना टेस्ट किट उपलब्ध नसल्याने या रुग्णाला श्वसनाचा त्रास नेमका कशामुळे होतो, हे ठरवणे रुग्णालयाला शक्य होत नव्हते. कोरोनासदृश लक्षण असल्याने अन्य कोणता उपचारही करता येत नव्हता. अशीच स्थिती सर्वच खासगी रूग्णालयांची झाली असून, उपचारात अडचणी येत आहेत.