corona virus : रत्नागिरीतील क्वारंटाईन केंद्रात असुविधांचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 04:43 PM2020-06-24T16:43:53+5:302020-06-24T16:45:27+5:30
परदेशातून सुखकर प्रवास करून रत्नागिरीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आल्यावर हाल झाले. रत्नागिरीतील सिंचन भवनातील क्वारंटाईन केंद्रातील गैरसोयींमुळे हाल झाले. या गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तर काही पालकांनी आपल्या मुलांची इतरत्र व्यवस्था केली होती.
रत्नागिरी : परदेशातून सुखकर प्रवास करून रत्नागिरीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आल्यावर हाल झाले. रत्नागिरीतील सिंचन भवनातील क्वारंटाईन केंद्रातील गैरसोयींमुळे हाल झाले. या गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तर काही पालकांनी आपल्या मुलांची इतरत्र व्यवस्था केली होती.
परदेशात शिक्षण घेणारे काही विद्यार्थी सोमवारी रात्री रत्नागिरीत दाखल झाले. रत्नागिरीतील दामले हायस्कूल येथे स्वॅब घेतल्यानंतर त्यांना सिंचन भवन येथील विश्रामगृहात क्वारंटाईन करण्यात आले. मात्र, हे विद्यार्थी तेथे पोहोचल्यानंतर असुविधांचा सामना करावा लागला. क्वारंटाईन केंद्रात बेड नाही, गाद्या नाहीत, अशी परिस्थिती होती. त्यातही केंद्रात पाण्याची सुविधा नसल्याचेही पाहायला मिळाले.
केंद्रातील खोल्यांमधील शौचालय गेले सहा महिनेच साफ केले नसल्याचे विदारक चित्र विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना पाहायला मिळाले. हे विदारक चित्र पाहिल्यानंतर रात्री उशिरा विद्यार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्वत: खोल्या साफ करून घेतल्या. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन केंद्रात ठेवण्यात आले. मात्र, काही नातेवाईकांनी येथील परिस्थिती पाहिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना अन्यत्र नेण्याचा निर्णय घेतला. अखेर केंद्रात कोणतीही नोंद न करता त्या विद्यार्थ्यांना त्यांनी अन्यत्र नेले. क्वारंटाईनसाठी असलेल्या केंद्रातील गैरसोयीबाबत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.
संतप्त भावना
सिंचन भवनाच्या विश्रामगृहातील क्वारंटाईन केंद्रात दोन पोलीस आणि शिक्षक कार्यरत होते. क्वारंटाईन केंद्रात नक्की माणसे ठेवतात का, असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणीही केली आहे.