corona virus : स्वॅब घेण्याच्या बहाण्याने फसवणूक करणारा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 06:28 PM2020-10-07T18:28:16+5:302020-10-07T18:32:12+5:30
ratnagiri, goverment hospital, fraud, coronavirus रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातून आल्याचे सांगून स्वॅब घेण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या १७ वर्षीय तरुणाला शहर पोलिसांनी बुधवारी दुपारी ताब्यात घेतले असून, त्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ८०० रूपये हस्तगत करण्यात आले आहे.
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातून आल्याचे सांगून स्वॅब घेण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या १७ वर्षीय तरुणाला शहर पोलिसांनी बुधवारी दुपारी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून ८०० रूपये हस्तगत करण्यात आले आहे.
रत्नागिरी शहरानजीकच्या शांतीनगर परिसरात एक व्यक्ती पीपीई कीट घालून नागरिकांचे स्वॅब घेण्यासाठी फिरत होता. या परिसरातील इमारतींमध्ये जाऊन आपण स्वॅब घेण्यासाठी आल्याचे सांगून नागरिकांकडे पैशाची मागणी करत होता. काही सुज्ञ नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. शहर पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणले.
त्याची चौकशी केली असता तो कोकण नगर येथील १७ वर्षीय तरूण असल्याचे पुढे आले. तो जिल्हा रुग्णालयातील लॅबमधून आल्याचे सांगून नागरिकांचे स्वॅब घेत होता. तसेच त्याने दोघांकडून प्रत्येकी ४०० रूपये असे ८०० रूपये घेतल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. याबाबत शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.