corona virus : वरवली ठरतेय कोरोनाचा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 12:11 PM2021-02-23T12:11:30+5:302021-02-23T12:12:47+5:30
corona virus Khed Ratnagiri- खेडमध्ये रविवारी आणखी सहा कोरोना बाधितांची भर पडली असून, आता तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ७६ वर गेली आहे. खेड तालुका जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे.
खेड : खेडमध्ये रविवारी आणखी सहा कोरोना बाधितांची भर पडली असून, आता तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता ७६ वर गेली आहे. खेड तालुका जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे.
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा एकदा लवेल येथील घरडा इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या हालचाली आरोग्य विभागामार्फत सुरू झाल्या आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेळके यांनी दिली आहे.
आंबवली आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वरवली या एका गावात ५५ रुग्ण, तर आंबवली गावात दोन, किंजळे गावात दोन अशा प्रकारे ५९ रुग्ण आहेत. वरवली हे अख्खे गाव कंटेन्टमेंट झोन असून, इतर नऊ ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडलेल्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. खेडमधील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ५५७ वर गेला असून, आतापर्यंत ७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ३० खाटांचे आयसोलेशन वॉर्ड आहे, तर खेड नगरपालिका दवाखान्यातील कोविड सेंटरमध्ये केवळ १० बेडची व्यवस्था आहे. तालुक्यात एकूण ७६ रुग्ण कोरोनाचे असल्याने उर्वरित रुग्णांना कामथे, रत्नागिरी येथे हलविण्यात येत आहे. दिवसाला कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत होणारी वाढ लक्षात घेता आता पुन्हा एकदा लवेल येथील घरडा इंजिनिअरिंग कॉलेजच्या वसतिगृहामध्ये कोरोना केअर सेंटर सुरू करण्याबाबत आरोग्य विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या इमारतीची पाहणी केली. कोविड सेंटर सुरू करण्याबाबतची आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा कोरोना केअर सेंटर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.