CoronaVirus : रत्नागिरीतील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली २९७वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:35 PM2020-06-02T13:35:10+5:302020-06-02T13:36:19+5:30
मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी सोमवारी रात्री १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २९७ इतका झाला आहे. तर संगमेश्वरातील एका वृद्धेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११६ झाली आहे़
रत्नागिरी : मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी सोमवारी रात्री १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २९७ इतका झाला आहे. तर संगमेश्वरातील एका वृद्धेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११६ झाली आहे़
मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने तपासणी अहवाल प्राप्त होत आहेत.
सोमवारी सकाळी ४२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये रत्नागिरी ७, खेडमधील कळंबणी रुग्णालयातील ८, गुहागरातील १ आणि राजापुरातील २ अहवालांचा समावेश आहे. रत्नागिरीतील ७ रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत.
त्यानंतर सोमवारी रात्री आणखीन १० अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल संगमेश्वर तालुक्यातील असून, सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, यातील एका वृद्ध महिलेचा अहवाल येण्यापूर्वी मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कोसुंब येथे नातेवाईकांकडे आलेल्या वृद्धेचा स्वॅब घेऊन तिला होम क्वारंटाईन करण्यात आले होते.
ही महिला घराजवळ पडल्याने तिला मार बसला होता. त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्यावर शासकीय निर्देशानुसार अंत्यसंस्कारही करण्यात आले होते. सोमवारी त्या महिलेच्या स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे दुसरा बळी गेला आहे.