corona virus : खासगी कोविड सेंटर सध्या सुरूच, रुग्ण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 02:07 PM2020-10-24T14:07:15+5:302020-10-24T14:08:59+5:30
coronavirus, hospitals, ratnagirinews कोरोनाच्या रुग्णांमध्ये आता घट होऊ लागली असली तरी अद्याप जिल्ह्यातील खासगी कोरोना रुग्णालये बंद करण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
रत्नागिरी : कोरोनाच्या रुग्णांमध्ये आता घट होऊ लागली असली तरी अद्याप जिल्ह्यातील खासगी कोरोना रुग्णालये बंद करण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यात मे महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सुरुवातीला जिल्हा शासकीय रुग्णालयात २०० खाटांचे कोरोना रुग्णालय तयार ठेवण्यात आले होते. परंतु त्यानंतर दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने जिल्ह्यातील कामथे, कळंबणी आणि दापोली या तीन उपजिल्हा रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांना उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, गणेशोत्सवात मुंबईहून येणाऱ्या गणेशभक्तांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून कोरोना केअर सेंटरची संख्या वाढविण्यात आली तसेच काही खासगी रुग्णालयेही अधिग्रहीत करण्यात आली होती.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन हजारांचा आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चार हजारांचा टप्पा ओलांडत कोरोना रुग्णसंख्या सप्टेंबरअखेरीस साडेसात हजारपर्यंत पोहोचली. सक्रिय रूग्ण वाढल्याने जिल्हा रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये अपुरी पडू लागली. त्यामुळे जिल्हा महिला रुग्णालय हेही कोरोना रुग्णालय म्हणून सुरू करण्यात आले.
२६ सप्टेंबरपासून कोरोना रुग्ण संख्येत घट होऊ लागली आहे. बरे होणाऱ्यांचेही प्रमाण ९२ टक्केपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्यांची एकूण संख्या २५० पर्यंत आली आहे. त्यामुळे शासकीय वगळून खासगी रुग्णालये बंद करण्याचा निर्णय विचाराधीन होता. इतर जिल्ह्यात काही खासगी कोरोना रुग्णालये बंद झाली आहेत. मात्र, रत्नागिरीत अद्याप कोणताच निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही.
ताण कमी
पाच खासगी रुग्णालये जिल्हा कोविड हेल्थ सेंटर तसेच काही शैक्षणिक संस्था, वसतिगृहे यामध्ये सौम्य किंवा अजिबात लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आली. त्यात रूग्णसंख्या आता खूप कमी आहे. मात्र ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
तरीही खासगी केंद्रे सुरूच
आता कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. सौम्य लक्षणे असलेल्यांना किंवा अजिबातच लक्षणे नसलेल्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय तसेच महिला रुग्णालयावरील ताणही कमी होत आहे. सध्या २५०च्या आसपास रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता खासगी कोरोना रुग्णालये बंद करण्याचा निर्णय विचाराधीन होता. परंतु प्रशासनाकडून अद्याप याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. कोरोनाचे रुग्णच नसल्याने घरडा रुग्णालय आता सर्वसामान्य रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहे.