corona virus : व्रतांच्या महिन्यात देऊळ बंद, कोरोनाचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 01:44 PM2020-07-21T13:44:05+5:302020-07-21T13:45:24+5:30

श्रावण महिन्यात जिल्ह्यातील बहुतांशी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विशेषत: श्रावणी सोमवारी शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी अद्यापही बंदच आहेत. श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन ही मंदिरे बंदच राहणार आहेत.

corona virus: Temple closed during the month of Vrata, corona disruption | corona virus : व्रतांच्या महिन्यात देऊळ बंद, कोरोनाचे विघ्न

corona virus : व्रतांच्या महिन्यात देऊळ बंद, कोरोनाचे विघ्न

googlenewsNext
ठळक मुद्देश्रावण महिन्यात नामसप्ताह, कीर्तन, मंदिरांमध्ये होते दर्शनासाठी गर्दी

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : श्रावण महिन्यात जिल्ह्यातील बहुतांशी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विशेषत: श्रावणी सोमवारी शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी अद्यापही बंदच आहेत. श्रावण महिन्यात मंदिरांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन ही मंदिरे बंदच राहणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील मंदिरांमध्ये श्रावण महिन्यात नामसप्ताह, कीर्तन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. रत्नागिरी शहरातील श्रीदेव भैरी, स्वयंभू काशीविश्वेश्वर तर श्रीदेव धूतपापेश्वर (ता. राजापूर), श्रीदेव गांधारेश्वर (ता. चिपळूण), श्रीदेव व्याडेश्वर (ता. गुहागर), श्रीदेव मार्लेश्वर (ता. संगमेश्वर) याठिकाणी श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी उसळलेली असते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ही मंदिरे उघडण्यास परवानगी न दिल्याने सर्वच मंदिरे व्रताच्या महिन्यात बंदच राहणार आहेत. केवळ काही अटी व शर्तींवर मंदिरातील धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार आहेत.

मार्लेश्वर मंदिराच्या पायथ्याशी देवस्थानने फलक लावून मंदिराकडे जाणारा मार्गच भाविकांसाठी बंद केला आहे. तर रत्नागिरीतील श्रीदेव भैरी मंदिरात मोजक्याच लोकांमध्ये संततधार, पूजा, आरती, दोन माणसांमध्ये रुद्राभिषेक सुरू राहणार आहे. मंदिरात कीर्तन होणार नाही. काशीविश्वेश्वर मंदिरातही मोजक्या लोकांमध्ये सप्ताह बसविण्यात येणार आहे. धूतपापेश्वर, व्याडेश्वर, गांधारेश्वर मंदिरांमध्येही केवळ धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.

मोजक्या लोकांमध्येच कार्यक्रम होणार आहेत. मात्र, मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता, भाविकांना मंदिर बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी श्रावण महिन्यात भाविकांना मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेता येणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे देवस्थानांकडून सांगण्यात आले. त्यामुळे यावर्षी गर्दीविनाच सप्ताह पार पडणार आहेत.

यावर्षी भेट मंदिरातच...

श्रीदेव काशीविश्वेश्वर आणि श्रीदेव भैरीच्या पालखीची भेट अविस्मरणीय क्षण असतो. दरवर्षी चौकात ही भेट होते. मात्र, यावर्षी भैरीची पालखी गाडीतून येईल आणि तेथून मंदिरात येईल तिथेच ही भेट होणार आहे.


अनेक वर्षांची परंपरा खंडित होऊ नये हीच इच्छा आहे. त्यामुळे मंदिरातील धार्मिक कार्यक्रम सुरू राहतील. अन्य भाविकांसाठी मंदिर बंदच ठेवण्यात येणार आहे.
- रवींद्र सुर्वे,
अध्यक्ष भैरी देवस्थान, रत्नागिरी.


मोजक्याच लोकांमध्ये सप्ताह बसेल. त्यानंतर मंदिराचे दरवाजे बंद होतील. सप्ताह बसल्यावर वीणा खाली ठेवता येणार नाही.
- कैलास विलणकर,
अध्यक्ष, काशीविश्वेश्वर देवस्थान, रत्नागिरी.


शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच व्याडेश्वर मंदिर आहे. मंदिरात श्रावणी सोमवारी गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी मंदिर बंदच राहील. केवळ पूजाअर्चा सुरू राहील.
- अरुण परचुरे,
अध्यक्ष, व्याडेश्वर देवस्थान, गुहागर.


शासन आदेश येईपर्यंत गांधारेश्वर मंदिर उघडण्यात येणार नाही. परिसरही बंद ठेवला जाणार आहे. केवळ सकाळी पुजाऱ्यामार्फत पूजा होईल. मात्र, अन्य कोणालाही मंदिरात प्रवेश नसेल.
- समीर शेट्टे,
अध्यक्ष, श्री जुना कालभैरव देवस्थान, चिपळूण

Web Title: corona virus: Temple closed during the month of Vrata, corona disruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.