मर्चंटनेव्ही अधिकारी बनलाय कोरोना योद्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:43 AM2021-06-16T04:43:03+5:302021-06-16T04:43:03+5:30
चिपळूण : मर्चंटनेव्हीतील अधिकारी अस्लम मालगुंडकर हे सुट्टीवर आलेले असताना स्वतःच्या नोकरीवर आणि कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून गेले महिनाभर कोरोना ...
चिपळूण : मर्चंटनेव्हीतील अधिकारी अस्लम मालगुंडकर हे सुट्टीवर आलेले असताना स्वतःच्या नोकरीवर आणि कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून गेले महिनाभर कोरोना योद्धा म्हणून जोमाने काम करत आहेत. आतापर्यंत चिपळूण संगमेश्वरमधील ६० कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्या जेवण खाण्याची स्वतःच्या घरातून व्यवस्था करून परत सुखरूप घरी सोडण्याचे काम या अधिकाऱ्याने केले असून, समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
कोरोना महामारीत अनेकजण आपल्या आईवडिलांचे मृतदेहही ताब्यात घ्यायला तयार नाहीत. परंतु चिपळूण येथे वास्तव्यास असणारे देवरुख आंबवलीमधील अस्लम मालगुंडकर हे एक मर्चंटनेव्हीतील अधिकारी आहेत. मूळ गाव संगमेश्वर तालुक्यात असल्याने त्यांनी सर्वाधिक काळजी आपल्या गावातील लोकांची घेतली. गोरगरीब तसेच घरात पुरुष माणसे नसलेल्यांना जेव्हा कोरोनाने ग्रासले, त्यावेळी मालगुंडकर यांनी नोकरी, पद, इतकेच नव्हे तर स्वतःच्या कुटुंबाला बाजूला करून स्वतःला या कामात झोकून दिले. लाईफकेअरचे डॉ. समीर दळवी यांनीही त्यांना त्यांना या कामात साथ दिली.
संगमेश्वरमधून कोरोना रुग्ण आणायचे आणि थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे, हे एकच काम हा अधिकारी करत राहिला. कोणाकडे पैसे आहेत किंवा नाही, त्यांचे नातेवाईक कुठे आहेत, पुढे काय करायचे या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वेळ न घालवता त्या रुग्णाला जगवायचे आहे, हाच उद्देश समोर ठेवून या माणसाने गेले महिनाभर अहोरात्र काम केले आहे.
रुग्णांना स्वतःच्या घरातून नाश्ता, जेवण तसेच त्यांच्या नातेवाईकांची काळजी घेताना त्यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे आणि नोकरीकडेही दुर्लक्ष केले. आजपर्यंत ६० कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये उपचार करून सुखरूप त्यांच्या घरी सोडण्याची धाडसी कामगिरी या अधिकाऱ्याने करून दाखवली आहे.
इथपर्यंत हा अधिकारी थांबलेला नाही. समुद्रात लाटांचा सामना करणाऱ्या या अधिकाऱ्याने थेट कोरोना मृतदेहांना खांदा देण्याचेही धाडस दाखवले आहे. लॉकडाऊन काळात देवरुख-आंबवली, संगमेश्वर येथील अनेक गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यांच्या या धाडसी समाजकार्याला शासकीय सेवेत असणाऱ्या त्यांच्या पत्नी नामीरा मालगुंडकर यांनीही मोलाची साथ दिली आहे. सुट्टीवर आसलेल्या मालगुंडकर यांच्या या सामाजिक सेवेचे अनेकांनी कौतुक केले.
.................
लाटा नेहमीच येत असतात. तो निसर्गाचा नियम आहे. अशा लाटांना घाबरून ध्येय सोडायचे नसते. ध्येय निश्चित असले, की यश हे मिळणारच. हाच माझा आत्मविश्वास आहे. समाजावर संकट असताना मी नेव्ही ऑफिसर म्हणून मिरवण्यात अर्थच नाही. त्यापेक्षा संकटात सापडलेल्यांना सहकार्याचा हात देऊन उभे करणे हे ध्येय ठेवून मी काम करत आहे.
अस्लम मालगुंडकर, चिपळूण.