फ्रंट लाईनवरील कोरोना योद्धे लस घेण्याबाबत बॅक फूटवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 02:13 PM2021-02-18T14:13:48+5:302021-02-18T14:15:03+5:30
Corona vaccine Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यातील १३ केंद्रांवर पहिल्या फळीतील कोरोना योध्द्यांसाठी लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, या लसीकरणासाठी मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने या कोरोना योध्द्यांना लसीकरणाची भीती वाटत आहे, की त्यांना लसीकरणाची गरज वाटत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यातील १३ केंद्रांवर पहिल्या फळीतील कोरोना योध्द्यांसाठी लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, या लसीकरणासाठी मिळणारा प्रतिसाद कमी असल्याने या कोरोना योध्द्यांना लसीकरणाची भीती वाटत आहे, की त्यांना लसीकरणाची गरज वाटत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
यादीत नाव असलेल्या १५,७७३ आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत ९४२२ जणांनी लस घेतली आहे. तसेच पहिल्या फळीतील महसूल, पोलीस या कर्मचाऱ्यांपैकी २३ टक्के कर्मचारीच लसीकरणासाठी पुढे आले आहेत. पहिल्या फळीतील यादीमध्ये नावे असलेल्या ४४६८ जणांपैकी ९८७ जणांनीच आतापर्यंत लस घेतली आहे. त्यामुळे फ्रंट लाईनवरील योद्धे लसीकरणात मात्र, मागे राहत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील १५ हजारपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी आली असून त्यांना लस दिली जात आहे. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सई धुरी, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. शुभांगी बेडेकर, भूलतज्ज्ञ मंगला चव्हाण यांनी लस घेऊन याचा शुभारंभ केला होता.
त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यानंतरही जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांनी स्वत: लस घेऊन आरोग्य, महसूल तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनाही लस घेण्याचे आवाहन केले होते.
शासनाने पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील शासकीय, खासगी डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय तसेच आरोग्य सेवक - सेविका यांना लस देण्यास सुरुवात केली आहे. ज्यांचे पहिल्या टप्प्यातील डोस पूर्ण होऊन २८ दिवस झाले आहेत, त्यांना आता दुसरा डोस दिला जात आहे. यासाठी शासनाकडून दुसऱ्या टप्प्यात कोविशिल्डचे आणखी दहा हजार डोस जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. लसीचा किरकोळ स्वरूपात त्रास होत असला तरी, त्याचे कुठलेही दुष्परिणाम अजूनही समोर आलेले नाहीत.
सध्या आरोग्य यंत्रणेतील व्यक्तींना लस देण्याबरोबरच फ्रंट लाईनवर कोरोनाशी लढा देणाऱ्या जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांपैकी लसीकरणासाठी १०२० जणांची यादी शासनाकडून आली आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांपैकी १७१७ जणांची यादीही प्राप्त झाली आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांकडूनही लसीकरणाला प्रतिसाद कमी मिळत आहे.
तेरा ठिकाणी होत आहे लसीकरण
जिल्ह्यात सध्या जिल्हा शासकीय रुग्णालय, दापोली, कळंबणी, कामथे ही तीन उपजिल्हा रुग्णालये तसेच मंडणगड, लांजा, संगमेश्वर, गुहागर, राजापूर ही ग्रामीण रुग्णालये, तसेच वालावलकर रुग्णालय, साखरपा उपकेंद्र तसेच रत्नागिरी शहरातील कोकण नगर आणि झाडगाव ही दोन नागरी आरोग्य केंद्रे या १३ ठिकाणी लसीकरण केले जात आहे.