मनोरुग्णांना कोरोनाचा फटका, औषधे न मिळाल्याने बळावला आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 12:12 PM2021-02-13T12:12:20+5:302021-02-13T12:18:48+5:30
mental hospital Ratnagiri-रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या मनोरुग्णांना कोरोनाच्या काळात वेळेवर औषधे न मिळाल्याने त्यांचा आजार बळावला. त्यामुळे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात कोरोनाच्या काळात असलेल्या रुग्णांमध्ये लॉकडाऊन शिथील होताच जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे.
शोभना कांबळे
रत्नागिरी : येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या मनोरुग्णांना कोरोनाच्या काळात वेळेवर औषधे न मिळाल्याने त्यांचा आजार बळावला. त्यामुळे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात कोरोनाच्या काळात असलेल्या रुग्णांमध्ये लॉकडाऊन शिथील होताच जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे.
येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून मनोरुग्ण उपचारासाठी येत असतात. कोरोनाच्या अनुषंगाने २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊनला सुरुवात झाली. त्यामुळे सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील केल्याने वाहतूक थांबली.
जे मनोरुग्ण रुग्णालयात भरती केलेले होते, त्यांची औषधे नियमित सुरू राहिली. मात्र, या पाच जिल्ह्यांत बरे होऊन परतलेल्या रुग्णांना त्यांच्या जिल्ह्यात ही औषधे उपलब्ध नसल्याने नियमित औषधांसाठी रत्नागिरीला येणे क्रमप्राप्त होते. मात्र, कोरोना काळात या रुग्णांना रत्नागिरीत आणणे त्यांच्या नातेवाईकांना शक्य झाले नाही; त्यामुळे बरे झालेल्या मनोरुग्णांच्या आजारात पुन्हा वाढ झाली.
येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील मनोरुग्ण रत्नागिरीत उपचारासाठी येतात. बरे होऊन जाणाऱ्यांनाही नियमित औषधे घ्यावी लागतात. ती औषधे येथील मनोरुग्णालयात मिळतात. मात्र, कोरोनाच्या काळात सर्वच बंद असल्याने या रुग्णांना औषधे वेळेवर मिळाली नाहीत; त्यामुळे त्यांच्या आजारात वाढ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले.
- डॉ. संजय कलकुटगी,
प्रशासकीय अधिकारी
या आजारांच्या रूग्णांमध्ये झाली वाढ
या पाच जिल्ह्यांमध्ये उपचार सुरू असलेले सुमारे २,१८६ मनोरुग्ण आहेत. यापैकी काही रुग्ण बरे झालेले असले तरी त्यांची औषधे नियमित द्यावी लागतात. ही औषधे रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून न्यावी लागतात. मात्र, लॉकडाऊनच्या काळात त्यांना ही औषधे मिळू शकली नाहीत. त्यामुळे काल्पनिक भयंगड (एन्झायटी), नैराश्य (डिप्रेशन), सिझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता) हे रुग्ण वाढले.