कोरोनाच्या डेल्टा प्लसने वाढविली रत्नागिरीची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:22 AM2021-06-25T04:22:33+5:302021-06-25T04:22:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असतानाच आता जिल्ह्यात डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटचे नऊ रुग्ण जिल्ह्यात सापडल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे.
जिल्ह्यात काेरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागल्याने आधीच अपुरे मनुष्यबळ असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या कसोटीचा कस लागत आहे. गेल्या सव्वा वर्षापासून आरोग्य यंत्रणेचा कोरोनाशी लढा सुरू असतानाच आता पुन्हा डेल्टा व्हेरिएंटचे तब्बल नऊ रुग्ण संगमेश्वर तालुक्यात नोंदविण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दिवसेंदिवस कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन पराकोटीचे प्रयत्न करीत असताना आता संगमेश्वर तालुक्यात सापडलेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांमुळे प्रशासनाच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.
त्यातच हे रुग्ण डेल्टा प्लसचे नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी रात्री आरोग्यमंत्री डाॅ. राजेश टोपे यांनी रत्नागिरीत डेल्टा प्लसचे नऊ रुग्ण असल्याचा गाैप्य स्फोट केल्याने जिल्हा प्रशासन पेचात आले आहे. नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्याने संगमेश्वर तालुक्यातील माभळे, धामणी, नावडी, कसबा, कोंडगाव ही पाच गावे १४ दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात आली असून, सुमारे साडेसहा हजारपेक्षा अधिक नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात काय खबरदारी घेतली जातेय?
संगमेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये परदेशातून सुमारे ३० ते ३५ व्यक्ती दाखल झाल्या होत्या. ब्रिटनसारख्या देशात डेल्टा प्लसच्या व्हेरिएंटचे म्युटेशन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे सर्वच देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे याच कालावधीत संगमेश्वर तालुक्यात परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे प्रशासन दक्ष झाले होते. त्यामुळे या तालुक्यातील पाच गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आली. या गावांमधील साडे सहा हजार नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी १४२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला असून, अन्य दक्षता घेतली जात आहे.
जिल्ह्यात दररोज दहा हजार टेस्टिंग सुरू
मार्चपासून रत्त्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची संख्या भरमसाठ वाढू लागली आहे. फेब्रुवारीअखेर ११ हजारापर्यंत रुग्ण आणि कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ३५० होती.
मात्र, मार्च महिन्यात शिमगोत्सवानंतर रुग्णसंख्येचा विस्फोट होत गेला. आतापर्यंत ही संख्या ५९ हजारांवर पोहोचली आहे. १,६७१ जणांचे मृत्यू झाले आहेत.
कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात वाढला आहे. त्यामुळे गावांमधील कुटुंबेच बाधित होऊ लागली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाला कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दिवसाला दहा हजार चाचण्यांचे नियोजन प्रशासनाने केले आहे.