कोरोनाचे वाढते रुग्ण अणि संभाव्य लाॅकडाऊन काळात सहकार्यासाठी ‘हेल्पिंग हॅंड्स’ सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:45+5:302021-04-13T04:30:45+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यावरील ताण वाढू लागला आहे. संभाव्य लाॅकडाऊन ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढू लागल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा यांच्यावरील ताण वाढू लागला आहे. संभाव्य लाॅकडाऊन आणि आरोग्य व्यवस्था या आनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सहायभूत ठरावे, या उद्देशाने रत्नागिरी आणि परिसरातील विविध संस्थांचा समावेश असलेल्या ‘हेल्पिंग हॅंड्स’ हा फोरम पुन्हा तत्परतेने पुढे आला आहे. यादृष्टीने चर्चा करण्यासाठी सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात या संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी विशिष्ट गटांमध्ये विविध कार्यांची विभागणी करून काम करावे, असे ठरले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेतही हेल्पिंग हॅंडसचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले होते. लाॅकडाऊन काळात या संस्थांनी एकत्र येत नागरिकांना अत्यावश्यक वस्तू घरपोच केल्या होत्या. कोरोनाची दुसरी लाट पहिलीपेक्षाही वेगाने पसरू लागल्याने वाढत्या रुग्णसंख्येने अपुरे मनुष्यबळ असलेल्या आरोग्य यंत्रणेवरील ताण अधिक वाढला आहे. तरीही आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करत असूनही यंत्रणेविरोधात उलट सुलट येणाऱ्या वृत्तांमुळे यंत्रणेचे मनोबल खचू लागल्याने आरोग्य सेवेवर विपरित परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यात कोरोनाच्या गंभीर रुग्णाला सेवा मिळताना अनेक अडचणी येत आहेत.
सध्याच्या भयावह स्थितीत कोरोना रुग्णाला तत्पर आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. यासाठी काेणत्या उपाययोजना कराव्यात, यावर चर्चा झाली. या चर्चेतून लोकांच्या मनात चाचणीबाबतची भीती दूर करण्यासाठी स्वतंत्र तपासणी केंद्र सुरू करावीत, असा मुद्दा पुढे आला. कोविड रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मानसिक आधार देणे, त्याचबरोबर त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य यंत्रणा यांच्यात योग्य समन्वय रहाणे गरजेचे आहे. रुग्णांसाठी काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेचे डाॅक्टर्स आणि कर्मचारी यांचेही मनाेबल वाढविणे गरजेचे आहे. यासाठी विविध गट तयार करून त्यांच्या माध्यमातून हे कार्य करावे, असे ठरविण्यात आले.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सध्याची कोरोनाचा प्रचंड वेगाने वाढणारा संसर्ग लक्षात घेता समाजातील गैरप्रकार थोपविण्याच्या दृष्टीनेही एखादा दबाव गट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत लवकरच जिल्हा प्रशासनाशीही चर्चा करण्याचे ठरले. या चर्चेत उपस्थित सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.