corona virus-जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू रत्नागिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:57 PM2021-02-10T16:57:38+5:302021-02-10T17:01:24+5:30
corona virus Ratnagiri- रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. सध्या ही संख्या कमी झाली असली तरी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचे कमी झालेले प्रमाण जानेवारी महिन्यात वाढले असून कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही या महिन्यात वाढली आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले असून आतापर्यंत मृत्यूची संख्या रत्नागिरी तालुक्यात अधिक आहे.
शोभना कांबळे
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी जास्त होत आहे. सध्या ही संख्या कमी झाली असली तरी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचे कमी झालेले प्रमाण जानेवारी महिन्यात वाढले असून कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही या महिन्यात वाढली आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले असून आतापर्यंत मृत्यूची संख्या रत्नागिरी तालुक्यात अधिक आहे.
एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांची ५ असलेली संख्या मे महिन्यात २८१ वर पोहोचली. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. गणेशोत्सवाच्या कालावधीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात मुंबईकर गणेशभक्त मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात परतले. त्यामुळे केवळ ऑगस्ट महिन्यात रुग्णसंख्या १७७३ झाली, तर कोरोनाने ७४ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाने उच्चांक गाठला. या महिन्यातच केवळ रुग्ण संख्या ३९४५ झाली तर मृत्यू झालेल्यांची संख्या १३० वर पोहोचली.
२६ सप्टेंबरअखेर कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊ लागली. त्याबरोबर मृत्यूचेही प्रमाण घटले. जानेवारपासून पुन्हा रुग्णसंख्या आणि मृत्यूची संख्या वाढू लागल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
पुरूषांचे मृत्यू जास्त
जिल्ह्यात ९ फेब्रुवारी अखेर कोरोनाने मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या ३५२ झाली आहे. यात पुरूषांची संख्या २६१, तर महिलांची संख्या ९१ आहे. सप्टेंबर महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक १३० बळी गेले. त्याचबरोबर या महिन्यात रूग्णसंख्याही भरमसाठ वाढली. मात्र, २६ सप्टेंबरपासून रूग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली. ऑक्टोबर महिन्यातील रूग्णसंख्या ८४६ वर आली, तर मृत्यू संख्या ५२ होती. मात्र नोव्हेंबर डिसेंबर हे दोन महिने कोरोना रूग्ण आणि मृत्यूच्या बाबतीत दिलासा देणारे ठरले.
० ते १५ वयोगटाची कोरोनावर यशस्वी मात
आतापर्यंत ० ते १५ वयोगटातील रूग्णांनी मृत्यूवर यशस्वी मात केली आहे. तसेच सुमारे ४२ बालके कोरोनामुक्त झाली आहेत. यात ऑगस्ट महिन्यात कोरोनाने निधन झालेले बालरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप मोरे यांचे योगदान महत्वपूर्ण होते. जानेवारी महिन्यात मात्र, १६ वर्षीय मुलाचा कोरोनाने मृत्यू झाल्याने ० ते २० वयोगटात एका मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत ६१ ते ८० वयोगटातील कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक १७९ आहे.