कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:33 AM2021-05-21T04:33:34+5:302021-05-21T04:33:34+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. रत्नागिरी तालुक्यात दररोज १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. रत्नागिरी तालुक्यात दररोज १०० पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत होते. मात्र, आता रत्नागिरी तालुक्यातील रुग्णांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ लागला आहे.
अजूनही मासेमारी ठप्पच
रत्नागिरी : कोरोनासह चक्रीवादळामुळे मासेमारी बंद ठेवावी लागल्यामुळे मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. आधीच मच्छीमार तोट्यात असल्याने वादळी वातावरणाचा अजूनही परिणाम आहे. खोल समुद्रातील वादळ अजूनही निवळलेले नाही. त्यामुळे मासेमारी बंदच ठेवण्यात आली आहे.
मजुरांची उपासमारी
खेड : कोरोनामुळे हातावर पोट असलेल्या मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काेरोनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये दानशूरांनी मोठ्या प्रमाणात गरीब, मजुरांना अन्नधान्याची मदत केली होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचे प्रमाण वाढले असले, तरी मदत करणाऱ्यांनी हात आखडते घेतले आहेत.
काजू व्यावसायिकांचे नुकसान
लांजा : जिल्ह्यात काजू बियांच्या व्यवसायातून माेठ्या प्रमाणात लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र, हा व्यवसाय सीझननुसार असल्याने एप्रिल, मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात चालतो. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत या व्यवसायाला ग्रहण लागले आहे. त्यामुळे काजू बी व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
लसींचा कमी प्रमाणात पुरवठा
राजापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असला, तरी लसी मिळण्याचे प्रमाण फार कमी आहे. शासनाकडून जसा लसींचा पुरवठा करण्यात येतो, त्याप्रमाणे लसीकरण सुरू करण्यात येते. लसीकरणाचे महत्त्व लोकांना समजू लागल्याने, लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी वाढू लागली आहे.
पावसामुळे चिखलाचे साम्राज्य
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेकडून गेले वर्षभर खोदाईचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी पाइपलाइन टाकण्यासाठी तसेच खासगी कंपनीकडूनही केबल टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. त्यातच पाऊस पडल्याने खोदाईच्या मातीमुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
मासळी बाजारात शुकशुकाट
रत्नागिरी : चक्रीवादळामुळे मच्छीमारांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण पसरलेले आहे. वादळामुळे फयानच्या आठवणीने आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यावेळी अनेक मच्छीमारांना जीव गमवावा लागला होता. त्या भीतीने चक्रीवादळामुळे मच्छीमारांनी नौका नांगरावर ठेवणे पसंत केले. त्यामुळे मासळी बाजारात शुकशुकाट पसरलेला आहे.