कोरोनाचा धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:32 AM2021-04-07T04:32:41+5:302021-04-07T04:32:41+5:30
राजापूर : सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेने प्रादुर्भावाचा वेग वाढला आहे. संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने ...
राजापूर : सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेने प्रादुर्भावाचा वेग वाढला आहे. संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने बाधितांची संख्याही वाढू लागली आहे. त्यातच सध्या बदलत्या वातावरणामुळे ताप सर्दी, खोकला आदी विकारही सुरु झाले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात कोरोनाचीही भीती निर्माण झाली आहे.
कोकणी मेवा विक्रीला
गुहागर : उन्हाळ्याच्या हंगामात कैऱ्या, काजूगर आदी मोठ्या प्रमाणावर विक्रीला येऊ लागले आहे. ग्रामीण भागातील महिला या कोकणी मेव्यांबरोबरच गावठी, फळभाज्या विक्रीसाठी आणत आहेत. या रुचकर मेव्याला तसेच भाज्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने या महिलांकडून विक्रीही चांगल्या प्रकारे होऊ लागली आहे.
वर्दळ वाढली
पाली : शासनाने मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने गेल्या वर्षीसारखे लॉकडाऊन पुन्हा होणार की काय? अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे आता बाहेरच्या भागातून आपल्या गावी परतणाऱ्यांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक मार्गांवर आता वर्दळ वाढू लागली आहे.
शैक्षणिक साहित्य वाटप
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा कसबा संगमेश्वर क्रमांक ३ ला समत्व ट्रस्ट ठाणे यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यात प्रिंटर, स्कॅनर व ई लर्निंग सुविधांचा समावेश आहे. शाळेच्यावतीने शिक्षक आदम सय्यद यांनी या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.
बॅग गहाळ
दापोली : खेड, दापोली एस.टी.ने प्रवास करीत असताना या दरम्यान निनाद सुरेश चौगुले यांची काळ्या रंगाची बॅग हरवली असल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली आहे. या बॅगेत निनाद चौगुले, रोहन कांबळे, तनया मालवे यांची एनसीसीची कागदपत्रे व पुस्तके असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
ग्राहकांसाठी ऑफर
चिपळूण : सध्या विविध मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करुन घेण्यासाठी विविध सवलती जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. अनेक मोबाईल कंपन्यांकडून आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्याने मोबाईल धारकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
रस्त्याची दुर्दशा
आवाशी : दापोली तालुक्यातील कुटाचा कोंड, टेटवली या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. डांबरी रस्ता उखडून गेला असून मोठमोठे खड्डेही पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन ये-जा करताना वाहन चालकांची दयनीय अवस्था होत आहे. बांधकाम खात्याने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.
पर्यटन स्थळांकडे पाठ
रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच महाराष्ट्र शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळी सुटीच्या हंगामात जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांची पाठ फिरू लागली आहे. गतवर्षीही पर्यटनावर कोरोनाचे सावट असल्याने पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता.
निराधार महिलेला आधार
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपानजीकच्या भडकंबा येथे श्रीपत मोरे यांचे काही महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. मोरे कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने शेतीचे काम करुन गुजराण करणारी त्यांची पत्नी वैशाली मोरे यांना दरमहा संजय गांधी पेन्शन योजना सुरू करुन देण्यात आली आहे. यासाठी येथील बापू शिंदे यांचे सहकार्य लाभले.