कोरोनाची धास्ती चोरट्यांनाही, रत्नागिरीत घरफोड्या घटल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 05:14 PM2021-03-18T17:14:07+5:302021-03-18T17:17:29+5:30
Crime News Ratnagiri Police- कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा परिणाम चोरट्यांवरही झाला असल्याचे घरफोड्यांच्या घटलेल्या संख्येवरून दिसत आहे. रत्नागिरी शहरात २०१८ मध्ये २४, तर २०१९ मध्ये ३० घरफोड्या झाल्या आहेत. मात्र, २०२० या वर्षी शहरात केवळ ७ घरफोड्यांची नोंद झाली आहे.
तन्मय दाते
रत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊन झाला आणि अनेक लोक घरीच थांबू लागले. या कारणासह कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या आणि संसर्गाच्या भीतीचा परिणाम चोरट्यांवरही झाला असल्याचे घरफोड्यांच्या घटलेल्या संख्येवरून दिसत आहे. रत्नागिरी शहरात २०१८ मध्ये २४, तर २०१९ मध्ये ३० घरफोड्या झाल्या आहेत. मात्र, २०२० या वर्षी शहरात केवळ ७ घरफोड्यांची नोंद झाली आहे.
कोरोनाने सन २०२० मध्ये सगळीच आर्थिक गणितं बिघडून टाकली होती. पहिले काही दिवस सगळेच व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर काही दिवसांनी ह्यवर्क फ्रॉम होमह्णला प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्याच्या सीमा सील झाल्या तर पोलीस २४ तास रस्त्यावर तैनात झाले.
या सर्व परिस्थितीचा परिणाम सर्वसामान्यांपासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकालाच झाल्याचे दिसले. त्याचप्रमाणे तो गुन्हेगारी क्षेत्रावरही झाला. कोरोनाच्या काळात पोलिसांबरोबरच ग्रामसुरक्षा दलासह पोलीस मित्र बनूनही अनेक नागरिक डोळ्यात तेल घालून न दिसणाऱ्या कोरोनापासून सर्वांचे संरक्षण करत होते. त्यामुळे चोरट्यांनाही बाहेर पडणे मुश्कील झाले होते. चोरी हाच आधार असणाऱ्यांचीही आर्थिक कोंडी झाली.
गेल्या काही वर्षांत घरफोड्यांचे प्रमाण खूपच वाढत आहे. २०१८ मध्ये रत्नागिरी शहरात २४ घरफोड्या झाल्या होत्या. त्यातील ४ चोऱ्या दिवसा झाल्या होत्या. एकूण ९ चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोड्यांचा हा आकडा सन २०१९ मध्ये ३० पर्यंत जाऊन पोहोचला होता. या चोऱ्यांमध्ये एक चोरी दिवसाची झाली होती. त्यातील ११ घरफोड्यांचा तपास पूर्ण झाला आहे. २०२० मध्ये मात्र शहरात केवळ ७ घरफोड्या झाल्याची नोंद आहे. त्यातील एक चोरी दिवसाढवळ्या झाली होती. या सर्व चोऱ्यांपैकी ३ चोऱ्यांचा छडा लावण्यात यश आले आहे. कोरोनाच्या धसक्याने चोरट्यांनीही बाहेर न पडण्याचे ठरविल्याची शक्यता असल्याने हे प्रमाण कमी झाले आहे.
घरातून बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना, नातेवाइकांना किंवा पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे. कोणताही किमती ऐवज बाहेर जाताना आपल्या सोबत किंवा घरातही ठेवू नका. किमती किंवा मौल्यवान ऐवज बँकेचा लॉकरमध्ये ठेवा. घराच्या आवारात जर सीसीटीव्ही असेल तर त्याचा डीव्हीआर सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
- अनिल लाड,
शहर पोलीस निरीक्षक, रत्नागिरी.