राजापुरात कोरोनाबाधिताचा मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:36+5:302021-06-05T04:23:36+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : नियमांचे पालन करून कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करू, अशी प्रशासनाला लेखी हमी दिल्यानंतर प्रत्यक्षात ...

Coronation's body was taken out and cremated at Rajapur | राजापुरात कोरोनाबाधिताचा मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार

राजापुरात कोरोनाबाधिताचा मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : नियमांचे पालन करून कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करू, अशी प्रशासनाला लेखी हमी दिल्यानंतर प्रत्यक्षात मात्र संसर्ग रोखण्याकरिता खबरदारी न घेता सफेद कपड्यामध्ये बांधून दिलेला मृतदेह बाहेर काढून धार्मिक विधी करण्याचा प्रकार शहरातील कोंढेतड येथे घडल्याचे समाेर आले आहे. या एकूणच प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली असून, या प्रकाराची नगर परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. आता प्रशासन काेणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

शहरातील कोंढेतड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाचा उपचार सुरू असताना लांजा येथे कोरोनाने मृत्यू ओढवला होता. या कोरोनाबाधित नागरिकाचा मृत्यू लांजा येथे झाल्याने तेथील नगर पंचायतीने नातेवाईकांशी संपर्क साधून मृतदेहावर तेथेच अंत्यसंस्कार करावेत, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, त्यावेळी काही पुढारी व नातेवाईकांनी मृतदेहावर आम्ही राजापुरात अंत्यसंस्कार करू, यासाठी मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली.

शासकीय नियमांचे पालन करण्याची हमी देत त्यासाठी राजापूर नगर परिषदेचे नाहरकत प्रमाणपत्रही देण्यात आले. प्रत्यक्षात मात्र अंत्यसंस्कारासाठी सफेद कपड्यात बांधून ताब्यात देण्यात आलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला व काही धार्मिक विधी करून नंतर त्या मृतदेहाचे दफन करण्यात आले. यावेळी नगर परिषदेतील दोन कर्मचारी या अंत्यसंस्कारावर देखरेख ठेवण्यासाठी उपस्थित होते. मात्र, विधीसाठी मृतदेह प्रार्थनास्थळात नेत आहोत, असे सांगून त्यानंतर मृतदेह वेस्टनातून बाहेर काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या साऱ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन प्रशासन जोरदार लढाई लढत असताना नागरिकच नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे उघड झाले आहे. भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी आता प्रशासन स्तरावरून कोणते पाऊल उचलण्यात येते, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.

Web Title: Coronation's body was taken out and cremated at Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.