coronavirus: रत्नागिरीत कोरोनाचा रूग्ण, अहवाल पॉझिटीव्ह येताच प्रशासकीय यंत्रणेत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 10:20 PM2020-03-18T22:20:42+5:302020-03-18T22:21:13+5:30
संबंधित रूग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील आहे. ते दुबईमध्ये काम करतात. कोरोनाच्या प्रकारामुळे ते दुबईहून परत आले.
रत्नागिरी : दुबईहून आलेल्या एका प्रौढाला कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. बुधवारी रात्री सव्वानऊ वाजता या रूग्णाचा अहवाल रत्नागिरीत थडकला आणि आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली. हा रूग्ण मंगळवारी जिल्हा रूग्णालयात दाखल झाला होता. तो कोरोनाग्रस्त असल्याची अधिकृत माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली. त्यांच्यासोबत आणखी दोघेजण दुबईहून आले होते. आता त्यांच्यावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. हा राज्यरातील ४५ वा रूग्ण आहे.
संबंधित रूग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील आहे. ते दुबईमध्ये काम करतात. कोरोनाच्या प्रकारामुळे ते दुबईहून परत आले. दुबईहून आलेल्या या प्रौढाची विमानतळावर तपासणी झाली. मात्र तो कोरोनाग्रस्त नसल्याचा अहवाल देण्यात आला. तेथून ते शृंगारतळी येथे आले. मंगळवारी त्यांना ताप येऊ लागल्याने ते एका खासगी दवाखान्यात गेले. ते दुबईहून आले असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या डॉक्टरनी त्यांना दुसºया डॉक्टरांकडे पाठवले. त्यांनाही ही माहिती लक्षात आल्यानंतर त्यांनी या रूग्णाला गुहागर ग्रामीण रूग्णालयाकडे पाठवले. तेथून १0८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने त्यांना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. जिल्हा रूग्णालयाकडून लगेचच त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले. बुधवारी रात्री या तपासणीचा अहवाल जाहीर करण्यात आला असून, संबंधित रूग्णाला कोरोना झाला असल्याचा अंतिम निष्कषै काढण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांची बैठक
पुणे येथून अहवाल येताच जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा शल्य चिकत्सिक डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी बबिता कमलापूरकर तसेच काही महत्त्वाच्या अधिकाºयांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर डॉ. बोल्डे यांनी संबंधित रूग्णाला कोरोना झाला असल्याची अधिकृत माहिती दिली.
आणखी दोघांवर लक्ष?
संबंधित रूग्णासोबत आणखी दोघेजण दुबईहून आले आहेत. मात्र ते कोठेही तपासणीसाठी पुढे आलेले नाहीत. आता या रूग्णाला कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यासोबत आलेल्या दोघांकडे आरोग्य यंत्रणेने आपला मोर्चा वळवला आहे.