Coronavirus: रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी; खेडमध्ये अहवाल येता येताच रुग्णाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 09:52 PM2020-04-08T21:52:20+5:302020-04-08T21:52:49+5:30
तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आणि त्याचवेळी त्याचा मृत्यूही झाला. त्यामुळे यंत्रणा हादरली आहे.
- मनोज मुळ्ये
खेड : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत बुधवारी एकाची भर पडली आणि दुर्दैवाने उपचारांना गती येण्याआधीच त्याचा मृत्यूही झाला. दुबईहून आलेल्या या व्यक्तीला खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. तो कोरोनाबाधित असल्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आणि त्याचवेळी त्याचा मृत्यूही झाला. त्यामुळे यंत्रणा हादरली आहे.
६ एप्रिल रोजी त्याला कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या संशयिताच्या स्वॅबचा नमुना मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आला. बुधवारी दुपारी त्याची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. सायंकाळी त्याचा अहवाल आला आणि तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. मात्र त्याच्या उपचाराला गती येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. या एकूणच प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खेड पोलिसांनी बुधवारी दुपारीच अलसुरे गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. संपूर्ण अलसुरे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
पहिलाच बळी
रत्नागिरी जिल्ह्यात याआधी तीन रुग्ण सापडले असले तरी त्यातील एक सुधारत असून, दोघांवर उपचार सुरू आहेत. मात्र चौथा रुग्ण निश्चित झाल्यानंतर लगेचच दगावल्याने जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आता त्यावर पुढील प्रक्रिया काय केल्या जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.