CoronaVirus : दापोलीत गरोदर महिलेला कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 11:55 AM2020-05-29T11:55:07+5:302020-05-29T11:57:55+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी गावातील एका ९ महिन्याच्या गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. खबरदारीचा म्हणून त्या महिलेला रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णालयात तिच्यावर उपचार करून तिची सुखरूप प्रसुती करण्याचे मोठे आव्हान आता वैद्यकीय अधिकाऱ्यासमोर आहे.
शिवाजी गोरे
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी गावातील एका ९ महिन्याच्या गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. खबरदारीचा म्हणून त्या महिलेला रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णालयात तिच्यावर उपचार करून तिची सुखरूप प्रसुती करण्याचे मोठे आव्हान आता वैद्यकीय अधिकाऱ्यासमोर आहे.
या महिलेच्या प्रवासाचा इतिहास मुंबई आहे. ही महिला मुंबईतून १८ तारखेला आपल्या गावी आली होती. ही महिला गरोदर असल्याने नियमित तपासणीसाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात आली होती. मात्र, तिच्यामध्ये लक्षणे जाणवू लागल्याने २६ मे रोजी तिचे स्वॅब घेण्यात आले होते. २८ मे रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रात्री तिला गावातून नेण्यात आले आहे.
ही महिला नऊ महिन्यांची गरोदर असल्याने तिची विशेष काळजी घेण्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशानुसार तिला रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. त्याठिकाणी एका स्वतंत्र खोलीत तिची देखभाल केले जाणार आहे. तसेच तिच्यासोबत तिच्या एका नातेवाईकाला सुद्धा राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्या महिलेचा प्रसुती कालावधी जवळ आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तिच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
दापोली तालुक्यातील खेर्डी देवके व केळशी या तीन गावांमध्ये १६ ते १८ मे यादरम्यान मुंबईतून आलेल्या तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वॅब घेतले होते. तसेच गावातील ग्राम कृती दलाने सुद्धा त्यांची खबर आरोग्य विभागाला दिली होती. त्यामुळेच त्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यास मोठी मदत झाली.
देवके व खेर्डी येथील दोन्ही पुरुष क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. पण केळशी येथील महिला होम क्वारंटाईन करण्यात आली होती. त्यांचा इतिहास तपासण्याचे काम सुरू आहे. हे तीनजण कोणाकोणाच्या संपर्कात आले होते त्यांचे नमुने घेतले जाणार आहेत.
तसेच देवकी व केळशी या तीनही गावांमध्ये कंटेनमेंट ची तयारी सुरू आहे. यापैकी देवके या गावांमध्ये यापूर्वी काही लोक आढळले होते त्यामुळे देवके यापूर्वी कंटेनमेंट घेऊन म्हणून जाहीर करण्यात आले होते. मात्र कंटेनमेंट उठण्याआधीच पुन्हा एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या गावामधला कंटेनमेंट कायम ठेवण्यात येणार आहे. तसेच खेर्डी या दोन गावांमध्ये नव्यानेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने या दोन्ही गावांमध्ये आता कंटेनमेंट झोन लावण्यात येणार आहे.
कोरोनाबाधित ९ महिन्याच्या गरोदर महिलेच्या पतीचा सलून हा व्यवसाय आहे. ते अनेक जणांच्या संपर्कात आल्याने केळशी गावात एकच खळबळ उडाली आहे गावातील अनेक जण त्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे आता प्रशासनाकडून १४ दिवसाचा इतिहास तपासला जाणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवा बिरादार यांनी दिली आहे.