CoronaVirus मुंबईहून उपचार करून दापोलीत आली; महिला कोरोनाबाधित झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 09:19 PM2020-05-04T21:19:24+5:302020-05-04T21:20:43+5:30
महिलेवर मुंबईला सायन येथे रूग्णालयात उपचार सुरू होते. तेथून ती दापोली तालुक्यातील आपल्या माटवण या गावी आली आहे.
दापोली : मुंबईहून दापोलीत आलेली एक महिला कोरोनाबाधीत असल्याचे अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. गेले ४० दिवस सुरक्षित असलेल्या दापोलीत पहिला रूग्ण सापडला असून, त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११ झाली आहे. तत्काळ कन्टन्मेंट एरिया व बफर झोन करण्याची कारवाई तालुका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
दापोली तालुक्यातील माटवण येथील एका ६५ वर्षीय महिलेचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी त्याचा अहवाल आला असून, सदर महिला कोरोनाबाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेवर मुंबईला सायन येथे रूग्णालयात उपचार सुरू होते. तेथून ती दापोली तालुक्यातील आपल्या माटवण या गावी आली आहे. त्यामुळे तिची तपासणी करण्यात आली होती. नुकतीच या महिलेवर एक शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याने तिची प्रकृती काहीशी गंभीर होती. शनिवार आणि रविवारी सलग दोन दिवस रत्नागिरीत दोन-दोन रूग्ण सापडले. त्यापाठोपाठ सोमवारी आणखी एक रूग्ण सापडला आहे.
माटवण गावाच्या सीमा बंद करण्यासह तेथे आरोग्य तपासणी करण्यासारख्या प्रक्रिया मंगळवारपासून सुरू केल्या जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. परंतु, या जिल्ह्यात मुंबई - पुणे या रेड झोनमधील व्यक्तीचा शिरकाव होतच राहिला तर पुढील काळात धोका वाढण्याची भीती आहे.