Coronavirus : ‘कोकणचा राजा’ हापूस आंब्यालाही कोरोनाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 12:59 AM2020-03-22T00:59:16+5:302020-03-22T04:21:37+5:30
Coronavirus: गतवर्षी पाऊस लांबला. उशिरापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच क्यार आणि माहा या दोन मोठ्या वादळांमुळे ऋतूचक्रात मोठे बदल झाले.
- मनोज मुळ््ये
रत्नागिरी : उशिरापर्यंत सुरू असलेली अतिवृष्टी, दोन मोठी वादळे यामुळे आधीच तोट्यात गेलेल्या हापूस आंब्याच्या उरल्या सुरल्या उत्पादनाला कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनामुळे आंबा निर्यातीला पूर्ण मर्यादा आल्या असून, कोकणच्या राजावर आता अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे.
गतवर्षी पाऊस लांबला. उशिरापर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच क्यार आणि माहा या दोन मोठ्या वादळांमुळे ऋतूचक्रात मोठे बदल झाले. त्याचा मोठा फटका किनारपट्टी भागाला अधिक बसला. या बदलामुळे थंडीचे आगमन उशिराने झाले. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत आंब्याला मोहोरच आला नाही. जानेवारी महिन्यात थंडी सुरू झाल्यानंतर मोहोर आला. मात्र या विलंबामुळे सरासरी उत्पादनाच्या ४0 टक्के इतकाच मोहोर आला. हा आंबा उशिराने हाती येणार हे निश्चित आहे. मे महिन्यात हापूससोबतच कर्नाटक, गुजरातचा आंबा बाजारात येतो. त्यामुळे उशिराने आलेले आंबा पीक बागायतदारांना फायदेशीर ठरत नाही.
एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी १ लाख टनापेक्षा अधिक आंबा उत्पादित होतो. त्यातून दरवर्षी ४00 ते ५00 कोटी रूपयांची उलाढाल होते. मात्र यंदा मुळातच या सरासरी उत्पादनात ६0 टक्क्यांची घट झाली आहे. जे काही उत्पादन हाती येणार आहे, ते परदेशी पाठवण्याची तयारी करण्यात आली होती. आॅनलाईन सुविधेमार्फत, पणन मंडळाकडून त्याबाबत मोठ्या हालचाली झाल्या होत्या. मात्र आता या साऱ्या प्रयत्नांवर कोरोनामुळे पाणी फेरले आहे. कोरोनामुळे बहुतांश देशांची विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे निर्यातीचा मोठा प्रश्न आहे. एप्रिलच्या मध्यापासून आंबा पीक हाती येण्यास सुरूवात होईल. मे महिन्यात त्याची आवक अधिक असेल. अशावेळी इतर राज्यातील आंब्याशी स्पर्धा करून कोकणाच्या राजाला बाजारात टिकाव धरणे अवघड होणार आहे. तोपर्यंत विमानसेवा सुरळीत झाली तरी इतर देशांमधून हापूसला मागणी येईल का, हा प्रश्न असेल.
आखाती देशात समुद्रमार्गे त्यातल्या त्यात थोडा दिलासा आखाती देशांमधील हापूस निर्यातीला मिळाला आहे. विमानसेवा बंद असल्याने
१0 हजार पेट्या आंबा समुद्रमार्गे आखाती देशांमध्ये पाठवण्यात आला आहे. ही सुविधा विमानसेवेपेक्षा खूपच स्वस्त असली
तरी त्यात जाणारा वेळ लक्षात घेता ती कायमस्वरूपी उपयोगी पडणारी नाही. यंदा निर्यात पूर्ण बंद होण्यापेक्षा एवढा तरी दिलासा मिळाला आहे.
निर्यातीची नवी दारे उघडून बंद
आॅनलाईन पद्धतीने युरोपीय देशांसोबतच यंदा दक्षिण कोरिया आणि अर्जेंटीना या दोन देशांकडून नव्याने हापूसला मागणी आली होती. त्यामुळे यंदा निर्यातीची नवी दारे उघडणार, हे बागायतादारांसाठी सुखावह होते. मात्र आता विमानसेवाच अडचणीत आल्यामुळे या देशांमध्ये होऊ शकणारी आंबा निर्यात धोक्यात आली आहे.