CoronaVirus : लॉकडाऊनच्या ग्रहणात मासेमारी आटोपणार, जूनपासून मासेमारी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 04:42 PM2020-05-30T16:42:19+5:302020-05-30T16:44:19+5:30
गतवर्षी लांबलेला पाऊस, दोन मोठी वादळे, त्यानंतर अनेकदा आलेले वादळी वारे यामुळे मासेमारी खूपच तोट्यात सुरू होती. त्यातच या मासेमारीला लॉकडाऊनचे ग्रहण लागले आणि हंगामातील सर्वात महत्त्वाचा काळ नुकसानातच गेला. आता या ग्रहणातच मासेमारी हंगाम आटोपणार आहे. १ जूनपासून ६१ दिवसांसाठी मासेमारी बंद होणार आहे.
रत्नागिरी : गतवर्षी लांबलेला पाऊस, दोन मोठी वादळे, त्यानंतर अनेकदा आलेले वादळी वारे यामुळे मासेमारी खूपच तोट्यात सुरू होती. त्यातच या मासेमारीला लॉकडाऊनचे ग्रहण लागले आणि हंगामातील सर्वात महत्त्वाचा काळ नुकसानातच गेला. आता या ग्रहणातच मासेमारी हंगाम आटोपणार आहे. १ जूनपासून ६१ दिवसांसाठी मासेमारी बंद होणार आहे.
कोरोनामुळे मासेमारी हंगामाचे दोन महिने तरी वाया गेले आहेत. त्यातच अनेकदा वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मासेमारी बंद ठेवावी लागली होती़ त्यामुळे यंदा मासेमारी व्यवसाय तोट्यात असल्याने मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़.
त्यामुळे मासेमारी हंगामात बंदी कालावधीतही काही ठिकाणी यांत्रिकी नौकांच्यरा सहाय्याने जीवावर उदार होऊन अनेक मच्छिमार मासेमारीसाठी खोल समुद्रात जात असल्याचे चित्र दिसून येते़ मिळणारे मासे मच्छि मार्केटमध्ये चढ्या भावाने विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईचा इशारा मच्छिमारांना दिला आहे़
पावसाळ्यात मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यालगत येतात़ त्यामुळे या काळात मासेमारी पूर्ण बंद राहते. अर्थात नियमांचा भंग करून पावसाळ्याच्या दिवसांत समुद्र खवळलेला असतानाही बंदी कालावधीत काही नौका बेकायदेशीरपणे मासेमारी करतच असल्याचे गेली काही वर्षे निदर्शनास येत आहे.
पर्ससीन नौकांवर बंदी असूनही गेल्या काही दिवसांत राजरोसपणे मासेमारी सुरु असल्याची तक्रार मच्छिमार सातत्याने करत आहेत. मात्र मत्स्य खात्याचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
नौकांचे पार्किंग फुल्ल
पावसाळ्याच्या दिवसांत मासेमारी हंगाम बंद असल्याने अनेक नौका किनारी लावण्यात येतात़ शासनाने ६१ दिवसांचा मासेमारी बंदी आदेश काढल्याने अनेक नौका मालकांची किनारी नौका लावण्यासाठी लगबग सुरु झाली आहे़. आता बंदरांवर नौका शाकारणीसाठी जागाच शिल्लक नसल्याने अनेक नौका किनाऱ्यावरच बंदरात नांगरावर उभ्या करुन ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळते़
यंदाचा मासेमारी संपूर्ण हंगाम तोट्यात गेला़ कारण पावसाळा उशिरापर्यंत सुरु होता़ त्यानंतर अनेकदा वादळ व सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे मासेमारी बंद ठेवावी लागली होती़ त्यानंतर कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने गेले दोन महिने मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली होती़ यंदाचा मासेमारी हंगाम यातच गेल्याने मच्छिमारांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे़ याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे़
- शब्बीर वस्ता,
मच्छिमार नेते, मिरकरवाडा, रत्नागिरी