CoronaVirus Lockdown : मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरूस्ती निधीत कपात, लॉकडाऊनचा बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 01:31 PM2020-06-08T13:31:06+5:302020-06-08T13:32:21+5:30
लॉकडाऊनमुळे शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिऱ्या बंधाऱ्याचे दुरुस्ती कामाचाही समावेश आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी मंजूर झालेल्या ९८ लाखांच्या प्रस्तावाला या निर्णयाचा फटका बसला आहे.
रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिऱ्या बंधाऱ्याचे दुरुस्ती कामाचाही समावेश आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी मंजूर झालेल्या ९८ लाखांच्या प्रस्तावाला या निर्णयाचा फटका बसला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या येथील रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात भरतीच्या पाण्याचा सामना करावा लागतो. येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी आजवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, तरीही मिऱ्यावासियांच्या डोक्यावरचे संकट दूर झालेले नाही. मिऱ्या बंधाऱ्याच्या सर्वेक्षणानंतर पावसाळ्यात धोका किंवा वाहून जाणारी सात ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. त्यांच्या दुरूस्तीचा ९८ लाखांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता.
निसर्ग चक्रीवादळामुळे या ठिकाणांना आणखीन धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अडीच महिने लॉकडाऊन असल्याने राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे राज्य शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीमध्ये ३३ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे मिऱ्या बंधाऱ्याच्या ९८ लाखांच्या दुरूस्ती प्रस्तावालाही कात्री लागणार आहे. या प्रस्तावातील अंदाजित रकमेलाही कात्री लागणार असल्याच्या निर्णयाला मंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला आहे. या बंधाºयाची तातडीची दुरूस्ती सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.