cyclone : आपत्तीच्या काळातही मंडणगड उपेक्षित, दौरे केवळ दिखाव्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:49 PM2020-06-11T12:49:59+5:302020-06-11T12:52:06+5:30
विकासकामांच्या बाबतीत नेहमीच दुर्लक्षित असलेला मंडणगड तालुका आपत्तीकाळातही उपेक्षित राहिल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील मंत्री अजूनही तालुक्यात फिरकलेले नसून, पालकमंत्र्यांनी दौऱ्यात केवळ बैठक घेण्यात धन्यता मानली.
मंडणगड : विकासकामांच्या बाबतीत नेहमीच दुर्लक्षित असलेला मंडणगड तालुका आपत्तीकाळातही उपेक्षित राहिल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील मंत्री अजूनही तालुक्यात फिरकलेले नसून, पालकमंत्र्यांनी दौऱ्यात केवळ बैठक घेण्यात धन्यता मानली.
खासदारांचा अजूनही पत्ताच नसून जिल्हाधिकारी यांनीदेखील रात्रीच्या वेळी तालुक्याचा दौरा केला. मंडणगड तालुक्यात सर्वाधिक नुकसान होऊनही अजून मदतीपासून ग्रामस्थ वंचित आहेत. फयान, त्सुनामी, कोरोना यांसारख्या राष्ट्रीय आपत्तीमध्येही मंडणगड तालुका जिल्ह्यातील अन्य तालुक्यांपेक्षा उपेक्षित राहिल्याची खंत आहे.
राष्ट्रीय तालुक्याला मिळणारी मदत एक भाग असला तरी निसर्ग चक्रीवादळानंतरही तालुका उपेक्षित राहिला आहे. वादळामध्ये तालुक्यातील १०९ गावांपैकी ७० टक्के गावे बाधित झाली आहेत. यापैकी ५० टक्के गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची वस्तुस्थिती असताना शासकीय व राजकीय स्तरावरील हालचाली पाहता या तालुक्यात आपत्ती नाहीच का? असा सवाल निर्माण होत आहे.
३ जून रोजी आलेले वादळ सायंकाळी ३ वाजता संपले असले तरी प्रशासनाचा संपर्क होण्यास पहाटेचे ४ वाजले होते. त्यानंतर पुढील ४८ तासात प्रशासनाचा किंवा लोकप्रतिनिधींना दापोलीपर्यंतचे दौरे करता आले, पण तिथून १ तास अंतरावर असलेल्या मंडणगड तालुक्यात दौरा करता आला नाही, याचे आश्चर्य वाटते.
वादळानंतर वेळास, बलदेववाडी, कांटे, केंगवल, रानवली, साखरी, जावळे, गुडेघर, काणकोर, नारायणनगर, वेळवी, देव्हारे इत्यादी गावांतील १०० टक्के घरांचे व बागायतींचे नुकसान झालेले असताना मंत्री आणि अधिकारी त्याठिकाणी फिरकलेच नाहीत. वेळास, बाणकोट परिसरातील शेतकऱ्यांच्या पिढीजात आंबा, काजू, नारळ, पोफळी, मसाले यांच्या बागा नेस्तनाबूत झाल्या. ही गावे विकास व रोजगारासाठी पन्नास वर्षे मागे गेली, असे असताना या गावांची विचारपूस करण्यासाठी कोणीही आले नाही.
घटनेनंतर दोन दिवसांनी सर्वप्रथम आमदार योगेश कदम यांनी वेळास परिसराला भेट दिली. त्यांनीही संपूर्ण परिसराची पाहणी केली नाही. यानंतर जिल्हाधिकारी यांनी रात्रीच्या अंधारात या परिसराला भेट दिली. पालकमंत्री यांनी रविवारी दौरा केला. पण, त्यांनी हा परिसर पाहिलाही नाही. त्यांनी अधिकाऱ्यांशी केवळ पंधरा मिनिटे चर्चा केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी आंबडवे येथे जाऊन पुन्हा दापोली गाठली. त्यामुळे त्यांचा हा दौरा नक्की कशाकरिता होता, असा सवाल उपस्थित होत आहे.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आखलेला दौराच रद्द केला. जिल्ह्याचे सुपुत्र असूनही तेही तालुक्यात फिरकलेले नाहीत. याचबरोबर एकनाथ शिंदे यांनीही तालुक्याला भेट देण्याचे टाळले. त्यामुळे सर्व पातळीवर तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना निर्माण होत आहे.
तालुक्याला सापत्नतेची वागणूक
कोणताही रोजगार तालुक्यात नाही. मनिऑर्डरवर ग्रामस्थ गुजराण करीत आहेत. अशावेळी त्यांच्यावर संकट ओढवले असताना त्यांना तातडीची मदत मिळणे अपेक्षित आहे. पावसात घरावर छप्पर नाही. अन्नधान्य, कपडे उडून मातीमोल झाले, उत्पन्न देणाऱ्या बागायतीही नष्ट झाल्या आहेत. शहरीकरणाचा वसा घेतलेल्या मंडणगड तालुक्याला आजही सापत्न वागणूक मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा पुढे आले आहे.