CoronaVirus News: राज्यातील 'या' जिल्ह्यात १ जुलैपासून पुन्हा कडक लॉकडाऊन; प्रशासनाने केले जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 03:28 PM2020-06-29T15:28:17+5:302020-06-29T15:34:11+5:30
लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रवासी वाहतूक शंभर टक्के बंद राहिल.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात दररोज कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळू लागले आहेत. कोरोनाची ही साखळी खंडित करण्यासाठी १ ते ८ जुलै या कालावधीत १०० टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी रविवारी संयुक्तरित्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ५५६ आहे. कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर आणण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यपातळीवर संबंधितांशी चर्चा करुनच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. रत्नागिरी शहरात आणि दापोलीतील २ गावात कोरोना रुग्णांचा कोणताही इतिहास नसल्याने जिल्ह्यात समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
‘ऑपरेशन ब्रेक द चेन’ हा निर्णय जिल्हावासियांच्या हिताच्या दृष्टीने घेतल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यात दि. १ ते ८ जुलैपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे़ सायंकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत कडक संचारबंदी राहणार आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही.
जिल्ह्याच्या सीमा बंद
लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व प्रवासी वाहतूक शंभर टक्के बंद राहिल. जिल्ह्यात येण्यासाठी बंदी घालण्यात आली असून, जिल्हा बाहेर जाणाऱ्या मालवाहू वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद राहतील. नागरिकांनी घरातच राहून कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
टास्क फोर्सची स्थापना
लॉकडाऊनबरोबरच कोरोना व्यतिरिक्त अन्य रुग्णांना सेवा मिळण्यासाठी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार आहे. तर जिल्हा रुग्णालय स्तरावर कॉलसेंटर सुरु केली जाईल. त्या माध्यमातून रुग्ण, नातेवाईकांना मदत केली जाईल.
रत्नागिरीतही प्लाजमा थेरेपी
मुंबई, पुण्यात सुरु असलेली प्लाजमा थेरेपी रत्नागिरीतही सुरु करण्यात येणार आहे़ या थेरपीद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले़
मृतदेह रुग्णालयातच पडून
जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिल्यामुळे एक मृतदेह दोन दिवस रुग्णालयातच पडून होता. जिल्हा रुग्णालयातील या गंभीर प्रकाराची दखल घेऊन एक सदस्य समिती स्थापन करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. दोन दिवसात या प्रकाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश सामंत यांनी दिले आहेत.