CoronaVirus : रत्नागिरी जिल्हा नाभिक समाजाचे हत्यार बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 06:09 PM2020-06-08T18:09:08+5:302020-06-08T18:11:43+5:30
लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने आणि शासन केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज संघटनेने लोकशाही मार्गाने हत्यार बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
चिपळूण : लॉकडाऊनमुळे उपासमार होत असल्याने आणि शासन केशकर्तनालय उघडण्यास परवानगी देत नसल्याने संतप्त झालेल्या रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज संघटनेने लोकशाही मार्गाने हत्यार बंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
लॉकडाऊन काळात रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम केशकर्तनालय चालक, मालक, कारागीर यांनी शासनाला सहकार्य करताना आपली दुकाने बंद ठेवली. परंतु, शासनाने नाभिक समाजाकडे दुर्लक्ष केले आहे. पाचव्या टप्प्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही केशकर्तनालये उघडण्यास परवानगी दिलेली नाही.
नाभिक समाजाचा उदरनिर्वाह पारंपरिक नाभिक व्यवसायावरच अवलंबून आहे. या समाजातील ९० टक्के लोकांकडे शेती नाही, अनेकांची दुकानेही भाडेपट्ट्याने घेतलेली आहेत. समाजासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. लॉकडाऊन आणि उपासमारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवारी चिपळूणमध्ये जिल्हा नाभिक संघाची तातडीची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीला रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष महादेव चव्हाण, रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण चव्हाण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले.