CoronaVirus : कोरोनाग्रस्ताचे अंत्यसंस्कार केल्यामुळे देवरुखात ग्रामस्थांचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 01:28 PM2020-05-27T13:28:36+5:302020-05-27T13:29:55+5:30
संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील ६१ वर्षीय वृद्धाचा मंगळवारी उपचारादरम्याने मृत्यू झाला. त्या व्यक्तीवर देवरुख कोल्हेवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील ६१ वर्षीय वृद्धाचा मंगळवारी उपचारादरम्याने मृत्यू झाला. त्या व्यक्तीवर देवरुख कोल्हेवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या व्यक्तीवरील अंत्यसंस्कारामुळे मंगळवारी सायंकाळपासूनच ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. या परिसरातील ग्रामस्थांनी बुधवारी सकाळी नगरपंचायतीवर धडक दिली.
कोरोनामुळे मृत्यू पावलेले ६१ वर्षीय वृद्ध १८ मे रोजी मुंबईतून आले होते़ ते आजारी असल्याने त्यांना दुसऱ्याच दिवशी १९ मे रोजी देवरुख येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ त्यांची तब्येत आणखीच बिघडल्याने त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़.
त्यानंतर त्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते़ त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती २१ मे रोजी प्राप्त झाली होती. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्यावर देवरूखातील कोल्हेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, या अंत्यसंस्कारामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी कोल्हेवाडी, हसमवाडी, तेलीवाडी, वरची आळी, मराठा कॉलनीसह इतर भागातील शेकडो ग्रामस्थ नगरपंचायतीवर धडकले.
यातून ग्रामस्थ आणि प्रशासनात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक व प्रतिष्ठित ग्रामस्थही उपस्थित होते. वादळी चर्चेनंतर देवरुख तहसीलदारांची भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले.
काहीही झाले तरी देवरुखबाहेरील गावांमधील कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांवर शहरातील कोणत्याही स्मशानात अंत्यसंस्कार करु नये अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. त्यामुळे तहसीलदारांसमवेत होणाऱ्या बैठकीत काय होणार, हेच पाहायचे आहे.