रत्नागिरी : मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला ठोकले टाळे, मंडणगड नगरपंचायत विशेष सभेला गैरहजर राहिल्याने नगरसेवक नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 06:41 PM2017-12-30T18:41:30+5:302017-12-30T18:44:43+5:30
मंडणगड नगरपंचायतीत शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन केले होते. मात्र, या सभेला प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी हजेरी न लावल्याने नाराज नगरसेवकांनी नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी कार्यालयालाच टाळे ठोकले. सर्व नगरसेवकांनी जिल्हा व महसूल प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या अनुपलब्धतेची कैफियत मांडली.
मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीत शुक्रवारी विशेष सभेचे आयोजन केले होते. मात्र, या सभेला प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी हजेरी न लावल्याने नाराज नगरसेवकांनी नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी कार्यालयालाच टाळे ठोकले. सर्व नगरसेवकांनी जिल्हा व महसूल प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या अनुपलब्धतेची कैफियत मांडली.
मंडणगड नगरपंचायतीची प्रस्तावित विकासकामे व विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी विशेष सभा आयोजित केली होती. मुख्याधिकाऱ्यांकडे कामाचा अतिरिक्त भार असल्याने त्यांच्या सोयीची वेळ लक्षात घेऊन त्यांनी दिलेल्या तारखेनुसार ही सभा बोलावण्यात आली होती.
पण, या सभेला मुख्याधिकारीच अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे नगराध्यक्षांसह उपनराध्यक्ष व नगरसेवकांनी नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी कार्यालयाला टाळे लावले. यावेळी नगराध्यक्ष प्रियांका शिगवण, उपनराध्यक्ष राहुल कोकाटे, नगरसेवक सुभाष सापटे, अॅड. सचिन बर्डे, शांताराम भेकत, कमलेश शिगवण, आदेश मर्चंडे, राजेश मर्चंडे, आरती तलार, नेत्रा शेरे, श्रध्दा लेंडे, श्रुती साळवी, स्वीकृत नगरसेवक मुंजीर दाभीळकर उपस्थित होते.
यासंदर्भात उपनगराध्यक्ष राहुल कोकाटे यांनी मुख्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी सभेस उपस्थित राहण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. मुख्याधिकाऱ्यांअभावी कोणतेही कामे होत नाही. त्यामुुळे ते सभेला हजर न राहिल्याने संतप्त झालेल्या सर्व नगरसेवकांनी मुख्याधिकारी कार्यालयाला टाळे लावत असल्याच्या तक्रारीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला ई-मेलच्या माध्यमातून पाठविले आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या सभेत नगरोत्थान योजनेतील १ कोटी रुपयांची व रस्ता अनुदान योजनेतील ४० लाखांच्या निधी विनियोगांच्या कामांच्या निविदा प्रक्रियेवरील मुख्याधिकाऱ्यांच्या सह्यांचे कामकाज आज पूर्ण होणार होते. मात्र, सभाच न झाल्याने हे काम पुढे गेले आहे.
मार्चआधी हा निधी खर्च न केल्यास ते परत जाण्याचा धोका आहे. शिवाय आज पाणी समस्येवर तत्कालीन उपाययोजना, शहर विकास आराखडा या महत्त्वाच्या विषयांवर निर्णायक कामकाज केले जाणार होते.