भ्रष्टाचार करणाऱ्यांची गय नाही
By admin | Published: May 10, 2016 10:18 PM2016-05-10T22:18:24+5:302016-05-11T00:09:53+5:30
रवींद्र वायकर : तब्बल ७६ कोटींचा निधी खर्च करूनही पिंपळवाडी धरण कोरडेच
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धरणांचा अभ्यास करून त्यांच्या आवश्यक दुरूस्तीची माहिती घेण्यात येईल. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शासनाला आराखडा सादर करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले. पिंंपळवाडी धरणासाठी ७६ कोटींचा निधी खर्च होऊनही पाण्याची उपलब्धता होऊ शकलेली नाही. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
खेड तालुक्यातील खोपी गावातील पिंपळवाडी धरणाची पाहणी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खेडचे उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड यांच्यासह परिसरातील अन्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी रवींद्र वायकर म्हणाले की, जिल्ह्यात असणाऱ्या धरणांतील पाण्याचा उपयोग नागरिकांना पिण्यासाठी व सिंचनासाठी होणे आवश्यक आहे. आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. याकरिता धरणांना भेटी देऊन पर्यटन विकास आराखड्याच्या धर्तीवर आराखडा तयार करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच पिंंपळवाडी धरणाचे पाणी शेतीसाठी आणि पिण्यासाठी उपलब्ध होण्याकरिता आवश्यक दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. त्यासाठी शासनाकडे पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद करण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांनी धरणाची पाहणी करून माहिती घेतली. या माहितीमध्ये धरणाच्या कामात कुचराई झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर कुंभाड येथील शिवस्मारकाला पालकमंत्र्यांनी अभिवादन केले. येथील परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित कसा करता येईल, याचीही त्यांनी पाहणी केली.
खोपी येथील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खेडचे उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड, विजयराव भोसले, अनंतराव भोसले, केशवराव भोसले, खोपीच्या सरपंच प्रणाली भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)