दाऊद इब्राहिमच्या खेड तालुक्यातील जागांची मोजणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:53+5:302021-04-08T04:31:53+5:30
खेड : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या तालुक्यातील मुंबके येथील मालमत्ता लिलावात विक्री झाल्यानंतर आता या ...
खेड : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या तालुक्यातील मुंबके येथील मालमत्ता लिलावात विक्री झाल्यानंतर आता या जमिनीची मोजणी प्रक्रिया साफेमाचे अधिकारी व लिलावात मालमत्ता विकत घेतलेले दिल्ली येथील सुप्रीम कोर्टाचे वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज यांच्या उपस्थितीत भूमिलेख विभागाने सुरू केली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे. भारत सरकारने दाऊदच्या भारतातील सर्व मालमत्ता ताब्यात घेतल्या व या मालमत्तांचा लिलावदेखील केला. गतवर्षी खेड तालुक्यातील मुंबके या दाऊदच्या मूळ गावातील मालमत्तांचा लिलाव झाला. यामध्ये दाऊदच्या बंगल्यासह त्याच्या बागायती व शेतजमिनींचा समावेश होता. दिल्ली येथील सुप्रीम कोर्टाचे वकील भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी मुंबके गावातील दाऊदच्या मालमत्ता लिलावात खरेदी केल्या. परंतु साफेमा विभागाने त्यांना आजपर्यंत या मालमत्ता त्यांच्या नावावर करून दिलेली नाहीत. भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर बुधवारी साफेमा विभागाचे अधिकारी यांनी भूमिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना मुंबके गावात पाचारण करून या मालमत्तांची मोजणी करण्याचे काम सुरू केले आहे.
या मोजणीला मुंबके गावचे सरपंच अकबर दुदुके यांच्यासह गावचे पोलीस पाटीलही उपस्थित होते. जागांची मोजणी करून मालमत्तांची हद्द निश्चित करण्याचे काम आज केले जाणार आहे. लिलावात मालमत्ता खरेदी केलेले भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी येथील मालमत्तांची स्वच्छता करण्याचे कामही सुरू केले असून शासनाने लवकरात लवकर या जमिनी नावावर करण्याची प्रक्रिया पार पाडावी, असे ते म्हणाले. या जमिनींमध्ये भविष्यात समाजोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचेही यावेळी भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी सांगितले.
धमक्यांना भीक नाही घालत
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा माझ्या दृष्टीने आपल्या देशाला लागलेला कलंक आहे. दाऊदच्या मालमत्ता लिलावात घेण्यासाठी जेव्हा मी धडपडत होतो तेव्हा त्याच्या हस्तकांनी मला धमक्या दिल्या होत्या. ‘जो लगायेगा बोली वो खायेगा गोली’, अशा धमक्या दिल्या होत्या. आज दाऊदच्या एवढ्या मालमत्ता मी लिलावात घेतल्या तरी धमक्या देणाऱ्यांची हिम्मत झाली नाही मला गोळ्या घालण्याची. त्यामुळे अशा धमक्यांना मी भीक घालत नाही, अशी प्रतिक्रिया भूपेंद्रकुमार भारद्वाज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
....................
khed-photo75 खेड : मुंबके येथील लिलावात विकत घेतलेल्या दाऊद इब्राहिमच्या बंगल्याची पाहणी करताना भूपेंद्रकुमार भारद्वाज.
--