खेडमध्ये बेसुमार वृक्षतोड सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:32 AM2021-03-27T04:32:13+5:302021-03-27T04:32:13+5:30
khed-photo261 खेड तालुक्यात अवैध वृक्षतोड करून विनापरवाना साठा करण्यात येत आहे. लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : तालुक्यामध्ये बेसुमार व ...
khed-photo261
खेड तालुक्यात अवैध वृक्षतोड करून विनापरवाना साठा करण्यात येत आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : तालुक्यामध्ये बेसुमार व बेलगाम वृक्षतोड सुरू असून, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मात्र त्याकडे कानाडोळा करत आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात तोडलेल्या झाडांचे ओंडके साठवून सोयीनुसार लाकूडमाफिया त्यांची वाहतूक करीत आहेत. सह्याद्रीच्या संरक्षित वनातील तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील मोठमोठे जंगली व संरक्षित जातीचे वृक्ष तोडून खुलेआम वाहतूक सुरू असून, त्यावर काेणतीच कार्यवाही हाेत नसल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.
खेड तालुक्यात शिवतर, शिव खादीपट्टा, पंधरा गाव धामणंद, बांद्री अठरा गावपट्टा या विभागातील हजारो झाडांची कत्तल दररोज केली जात आहे. अनेक ट्रक, ट्रॅक्टर अशा वाहनातून वन कायद्यांची व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची कोणतीही भीती न बाळगता राजरोसपणे वाहतूक सुरू आहे. लाकूडमाफिया जंगल तोड, अवैध लाकूडसाठे यासंदर्भात वन विभागाकडे माहिती देणाऱ्यांना परस्पर भेटून, केलेली लाकूडतोड व लाकूडसाठा कसा कायदेशीर आहे हे पटवून देण्यासाठी पुढे सरसावत आहेत. त्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारीही सारवासारव करून लाकूड माफियांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात, असा प्रकार खेड तालुक्यात सुरू आहे. यापूर्वी एका तालुका वन अधिकाऱ्याला दापोलीचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी निलंबित केले होते. परंतु त्यानंतर केवळ काही महिने वन विभागाच्या तालुका यंत्रणेत सुसूत्रता आल्याचा अनुभव खेडवासियांना आला होता.
गेल्या दीड वर्षात लाकूडमाफिया उदंड झाले असून पुन्हा एकदा जंगलांची कत्तल सुरू झाली आहे. तालुक्यातील वनाच्छादित प्रदेश ते रस्त्याच्या कडेला सामाजिक वनीकरण विभागाने लावलेल्या झाडांचीही कत्तल सुरू आहे. तालुक्यातील कोणत्याही भागात वृक्षतोड सुरू असल्यास त्याची माहिती जागरूक वनप्रेमी नागरिकांनी तालुका वन विभागाच्या अधिकारी अनिल दळवी यांच्याकडे संपर्क साधला असता, सर्वांना परवानगी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. कोल्हापूर विभागाचे वन अधिकारी व फिरत्या पथकाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काेट
खेड तालुक्यात सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीसंदर्भात आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. यापुढे आम्ही स्वतः या कार्यालयात लक्ष वेधून अवैध वृक्षतोड रोखण्याचा प्रयत्न करणार आहाेत.
- वैभव बोराटे, परिक्षेत्र वन अधिकारी, दापोली.