लाॅकडाऊनचा फायदा उठवत खेडमध्ये बेसुमार वृक्षताेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:40+5:302021-06-09T04:39:40+5:30
खेड : तालुक्यातील मोहाने गावानजीक डोंगर-उतारावरील झाडांची लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन लाकूड व्यापाऱ्यांनी मजुरांच्या साथीने दिवसाढवळ्या बेसुमार कत्तल केली असून, ...
खेड : तालुक्यातील मोहाने गावानजीक डोंगर-उतारावरील झाडांची लॉकडाऊनचा गैरफायदा घेऊन लाकूड व्यापाऱ्यांनी मजुरांच्या साथीने दिवसाढवळ्या बेसुमार कत्तल केली असून, याप्रकरणी वनविभाग मात्र डोळे झाकून गप्प बसला आहे. शेकडो झाडांची कत्तल करून मोहाने गाव परिसरात व रस्त्यालगतच त्याचा साठा करण्यात आला असून, प्रशासन व वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
खेड तालुक्यात लाॅकडाऊनचे आदेश धाब्यावर बसवून लाकूड व्यावसायिक सुमारे पन्नास माणसे गोळा करून ग्रामीण भागात खासगी जंगलावर कुऱ्हाड चालवण्यात गुंतलेले आहेत. तालुक्यातील मोहाने गावाच्या परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात डोंगर-उतारावरील झाडे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. सामान्य शेतकऱ्यांना शेतीची यांत्रिक अवजारे चालवण्यासाठी इंधन उपलब्ध होत नसताना हे लाकूड व्यापारी पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांनी या झाडांची दिवसाउजेडी तोड होत असताना काेणतीच कारवाई हाेत नाही.
तालुक्यातील खेड ते आंबवली मार्गालगत डोंगर-उतारावरील झाडांची मोहाने परिसरात तोड होत असल्याने आगामी पावसाळ्याच्या कालावधीत या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. वनविभागाच्या कार्यालयात या प्रकरणी चौकशी केली असता, मोहाने येथे होत असलेल्या लाकूडतोडीविषयी समर्पक माहिती तेथे उपस्थित कोणीही कर्मचारी देऊ शकला नाही. खेडचे नवनियुक्त वनाधिकारी सुरेश उपरे हे कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
------------------------------
खेड तालुक्यातील मोहाने गावाच्या परिसरात डोंगर-उतारावर बेसुमार वृक्षतोड करण्यात येत आहे़