पती-पत्नीने एकाच दिवशी घेतला जगाचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:20+5:302021-04-27T04:32:20+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने घरी सकाळी ९ वाजता निधन झाल्याचे कळताच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पतीनेही ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने घरी सकाळी ९ वाजता निधन झाल्याचे कळताच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पतीनेही सायंकाळी आपला प्राण साेडल्याची हृदयद्रावक घटना खेड तालुक्यातील कुंभवली येथे रविवारी घडली. फातिमा उस्मान सकवारे (६५) आणि उस्मान बाबामिया सकवारे (७०) अशी त्यांची नावे आहेत. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दाेघांच्या आयुष्याचा शेवटही एकत्रच झाला.
कुंभवली गावातील प्रतिष्ठित लाकूड व्यापारी उस्मान सकवारे यांना कोरोनाची लागण झाली होती. ते कामथे रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांची प्रकृती सुधारत होती. कोरोनावर मात करण्याची जबर इच्छाशक्ती त्यांनी बाळगली होती. घरातदेखील सर्व व्यक्ती कोरोना निगेटिव्ह होत्या. अशा परिस्थितीत काळाने मात्र वेगळ्याच पद्धतीने येथे झडप घातली.
अतिशय उत्तम ठणठणीत प्रकृती असलेल्या फातिमा उस्मान सकवारे यांना रविवारी सकाळी ९ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका बसला. त्यातच त्यांचे निधन झाले. दुपारी कुंभवली येथील कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात आला. दुर्दैवाने त्यांच्या निधनाने वृत्त पती उस्मान सकवारे यांना हॉस्पिटलमध्ये समजले आणि पत्नीच्या अशा अचानक निधनाने जणू त्यांना धक्काच बसला. काही वेळेतच त्यांनी प्राण सोडले आणि पत्नीच्या पाठोपाठ या जगाचा निरोप घेतला. सकवारे कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. रविवारी रात्री त्यांचाही दफनविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात मुले-मुली सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.